विचार महत्त्वाचा- इट इज द थॉट दॅट काउंटस...

मी एम. . करत असतांना आजीकडे राहत होते, तेंव्हाची गोष्ट. माझी तेंव्हा सत्तरीची आजी रोज अतिशय छान स्वयंपाक करायची दोघींसाठी. अगदी सकाळचीच भाजी असेल, तरी नवीन कोशिंबीर तरी, किंवा साधी खिचडी असेल तरी त्यात नवीन प्रयोग करून, सगळ्या डाळी घालून त्यांना वेगळीच चव आणायची. तिला बिचारीला जेमतेम अर्धी पोळी जात असेल, प्रकृती, पचनशक्ती मंदावलेली, पण उत्साह दांडगा, अशीच ती अजूनही आहे. पण तरीही, कधीकधी तिला वाटायचं, की मी तिला स्वयंपाकात मदत करावी, तिच्यासाठी नव्हे, तर मला शिकायला मिळेल म्हणून.
आता आईकडे मी स्वयंपाकात अजिबात लक्ष घातलं नव्हतं. भाजी चिरायला मला आवडतं, आणि ते मी तिथेही करत होते, पण आपण सुंदर चिरलेली भाजी फोडणीस घातली, की त्याचं भरीतच होणार, अशी भीती सतत मनात असायची. कुठे आजीचा उत्तम स्वयंपाक, आणि कुठे आपले नवशिक्याचे प्रयोग- आपल्या हातचं तिला खावं लागू नये, ह्याकडेच जास्त कल होता :)
एकदा मात्र मजा झाली, मी सकाळी सकाळी अंघोळ करून तयार, आणि आजीने मला म्हणायला- की आज तू स्वयंपाक करतेस का? आणि मी तिला सांगायला- की मैत्रिणींबरोबर पिक्चरचा प्लॅन आहे, त्यामुळे लगेच तिकिटं काढायला जातेय... एकच गाठ पडली. तिला एकदम रडू आलं- थकली असणार, कधी आयतं मिळावं असं तिलाही वाटलं असणार, पण उठली, भराभरा कामाला लागली. तेव्हा आणि त्यानंतर अनेकदा माझ्या मनात विचार यायचा- की आज तिला म्हणूया- “तू बस, मी करते सगळा स्वयंपाक- जसा होईल तसा, पण तुला आराम तरी मिळेल.” पण तेवढी जबाबदारी घ्यायची सवय नव्हती तेंव्हा, आणि गळ्यात पडल्याशिवाय करता येईल असा आत्मविश्वासच नव्हता. विचार खूप केला मी, पण नाहीच जमलं...

आता लग्न झालं- नवऱ्यावर प्रयोग करून करून बऱ्याच गोष्टी शिकत गेले :) आणि तेव्हा आजीने बोलता बोलता सांगितलेले मंत्र आता आठवू लागले. पण एकीकडे युनिव्हर्सिटी, पार्ट टाईम नोकरी करतांना कधीतरी वाटतं- की आता नवऱ्याने का कधी भात-वरण लावून ठेवू नये? मी रात्री उशीरा क्लासहून येणार असले, तर नूडल्स का होईना, करून ठेवायला काय जातंय ह्याचं? हा नाही का लग्नाआधी वर्ष इथे एकटा राहिला, तेव्हा करतच होता ना? पण मी जशी आजीला मदत करायला घाबरले, तसा तो ही घाबरतोच. अगदी चहा सुद्धा मला त्याच्या पद्धतीचा आवडत नाही, हे जाणवून मागे मागेच राहतो... त्याच्या मनातही असतील ना विचार, मला मदत करण्याचे, पण It is the thought that counts, or is it???
मधे आमचा असाच वाद झाला. "मी तुला बॅंकेची कामं सांगून ठेवली होती, ती झाली का नाही अजून?" - तो मला विचारत होता. "अरे होती डोक्यात, आहेत डोक्यात, पण वेळ नाही मिळाला!” मी काहीतरी थाप ठोकली. खरंतर मी ती कामं का केली नव्हती हे माझं मलाच माहिती नव्हतं. पण विचार डोक्यात होता, हे ही तितकंच खरं! "आता तुझ्या डोक्यातले विचार मला कसे दिसणार आहेत?? तर मी काय समजू की तू नक्की तो विचार करते आहेस, की नाहीस???"
झालं, त्यावरून अर्धा तास मेजर भांडण. मी सांगतेय मी करणार आहे, आणि त्याचं एकच पालूपद- कधी? आणि कशावरून तू विसरणार नाहीस.....! आता मनातल्या विचारांचं मी तुला काही प्रूफ देऊ शकत नाहिये, त्यामुळे तुझंच खरं, असं म्हणून मी गप्प बसले. पण ह्याने तरी माझ्यावर थोडा विश्चास दाखवावा की नाही, असं वाटल्यावाचून राहिलं नाही.

झालं, एक दोन महिन्यांनी माझा वाढदिवस आला. बाहेर जेवायला जाऊन आलो. गिफ्ट काय मिळणार हे आधीच ठरलेलं होतं, त्यामुळे दिवस मजेत गेला. त्यानंतर जवळजवळ आठवड्याने हा गेला होता कायतरी सामान आणायला जवळच्या ग्रोसरीत. आला, आणि माझ्यासमोर एक ग्रीटिंग आणि चॉकलेट! "हे तुझ्या वाढदिवसाचं ग्रीटिंग! त्यादिवशी घ्यायचा विचार होता, पण वेळच मिळाला नाही!!! आता मी ह्यावर काय उत्तर द्यावं?? "It is the thought that counts? !"
हे असं फक्त आमच्या सो कॉल्ड intellectual भांडणांबद्दलच नव्हे, तर कितीतरी गोष्टी अशा असतात- माझ्या मैत्रिणींना मी पत्र पाठवायची, आणि त्यांची उत्तरं मात्र कधीच येत नाहीत, तेंव्हाचं ठरलेलं कारण म्हणजे, "अगं मी पत्रं लिहणार, लिहणार असं ठरवत होते, तोवर तूच इंडियात येणारेस असं कळलं!" मग मी पण त्यांना सांगते, की, "अगं, मी पण सगळ्यांसाठी भरपूर खाऊ आणणार होते, पण विचार केला, की आजकाल काय, भारतात सगळंच मिळतं की! But it is the thought that counts, नाही का?"

मधे एकदा अशीच मज्जा झाली, मी भरपूर शॉपिंग करून घरी आले, तर नवरा म्हणाला, "हे सगळं अगदी आत्ता घ्यायलाच हवं होतं का? जरा ही कसा तुम्ही बायका खर्चाचा विचार करत नाही?" (नवऱ्याच्या जातीला शॉपिंगमधली मज्जा कशी ती कळतच नसते- काय की बाई) तर मी पण ठोकून दिलं, "अरे बराच विचार केला, पण सेलवर एवढे स्वस्त कपडे नंतर मिळणार आहेत थोडीच! आणि घ्यायला गेलं की नेमके आवडत नाहीत ना! खर्चाचा विचार करूनही हे कपडे अगदीच स्वस्त मिळाले बरं का! म्हणजे अगदीच मला काही काळजी नाही असं नाही..."

बाकी हे "थॉट काउंट" होण्याचं बरंय. माझ्या अशा वर्षातल्या अनेक आवरा-आवऱ्या, घालायची लोणची, करायचे पदार्थ, हे "थॉट काउंट" मधे जर जमा झाले नसते, तर मला स्वतःला मी फारच आळशी वाटून माझ्या प्रतिमेला जोरदार धक्का बसला असता, त्याचं काय? आणि नाही म्हटलं तरी, बिलेटेड वाढदिवसाचं ग्रीटिंग आलं, म्हणून काही त्यातला आनंद कमी होत नसतो, होय ना? आता कोणीतरी अगदी सपशेल आपली चूक कबूल करून, तुमच्या विसरलेल्या का होईना, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतंय म्हटलं, की तुम्ही कितीही पाषाणहृदयी असा, वितळालच का नाही? ह्या वितळण्यावरच तर "थॉट काउंटांची" सगळी भिस्त आहे महाराजा! नाहीतर मागच्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला आमच्या घरी रणच माजणार होतं...

त्याचं काय झालं, की, माझ्या प्रेमळ नवऱ्याला valentines day ला मला काहितरी गिफ्ट आणायची हुक्की आली. त्याने मला एक छानसं Coupons Booklet आणलं (नाही, किराण्याचे कूपन्स नाहीत हं, इतके ही आमचे हे काही हेSSS नाहियेत!) तर त्यातली कूपन्स म्हणजे- Romantic Dinner for two, Movie Night, Shopping day, Recreation of our first meeting, Adventure trip, Nature-walk असल्या भन्नाट कल्पना होत्या. Basically, मी ते कूपन्स मला हवे तेव्हा वापरायचे, आणि त्याने मला ती ती गोष्ट त्यादिवशी गिफ्ट करायची- असं. आता मी अगदीच नवीन नवीन प्रेमात पडलेली असते, तर ठेवलाही असता विश्वास त्या कूपन्सवर, पण नाही ठेवला तेच बरं झालं. ह्या गोष्टी काय खऱ्या खऱ्या थोड्याच कोणी करत असतं? (अमेरिकन्स करतही असतील, पण आपण भारतीय प्रेमाच्या बाबतीत जरा कल्पनाशून्यच असतो, त्यामुळे...) तरी मी हिम्मत करून लगेच त्यातलं एक कूपन फाडलंच(साधंच होतं काहीतरी- my favorite ice-cream dessert वगैरे)... तर नवऱ्याचं उत्तर तयारच होतं, "आता इतक्या रात्री एकही दुकान उघडं नसणारे, आणि आता पुन्हा कपडे घाला, त्यापेक्षा ग्रोसरीतून आणूया परवा...तसंही येवढ्या थंडीत तुला आईस्क्रीम काय सुचतंय, इकडे पोटाचे घेर वाढतायत... आणि ते कूपन वगैरे आहे, पण-

"IT IS THE THOUGHT THAT COUNTS, नाही का!"- मीच त्याचं वाक्य पूर्ण केलं.