समजूत

कुठल्या मुशीत घडले समजूत काढणारे ?
जखमेत मीठ तसले, समजूत काढणारे

सोडा स्मृतींबरोबर, त्यांना किती विनवले
नाही मुळीच बधले समजूत काढणारे

पुतळ्यासमान बसलो निस्तब्ध कोरडा मी
छाती पिटून रडले समजूत काढणारे

सर्वांसमक्ष देऊ अश्रूंस वाट कैसी ?
हेही कुठे उमगले समजूत काढणारे

घालून काळ गेला जेव्हा झडप तिच्यावर
कुठल्या बिळात दडले समजूत काढणारे ?

खांद्यास लावुनीया खांदा कुणी न लढले
आता इरेस पडले समजूत काढणारे

इकडे मला म्हणाले विसरून सर्व जा तू
अन् आठवांत रमले समजूत काढणारे

सुटले मुखांस पाणी पाहून दुःख माझे
चघळावयास बसले समजूत काढणारे ...