नवकवितेचे नवप्रास्ताविक आणि पुनर्प्रकाशित नवकविता...

नवकवितेचे नवप्रास्ताविक

हल्ली सगळीकडे नवकवितांचे पेव फुटले आहे. जो तो उठतो तो नवकविता रचतो. (मात्र कवीने न उठता एकाच जागी बसून ही कविता रचली आहे.) त्याच प्रकारातली ही एक नवकविता. वाचणाऱ्यांच्या दोन घटका मजेत जाव्यात एवढीच इच्छा. वास्तविक ही कविता संपूर्ण वाचायला कमीत कमी साडेसात घटका निश्चित लागतील. (या आकड्याबद्दल साशंक असल्यास पूर्ण धैर्य एकवटून घड्याळ लावून आख्खी कविता वाचून काढावी. लावलेल्या घड्याळ्यातून वेळ मोजायला विसरू नये.) पण दोन घटकांनंतर अचानकपणे उफाळून आलेल्या आत्यंतिक किळसीमुळे वाचक पूर्ण कविता वाचण्याचे धाडस करीत नाही. (जर कोणी आख्खी कविता किळस न येता (कमीत कमी किळस आली तरी तसे न दाखवता) वाचून दाखविल्यास त्याला कवीच्या 'फेकावली' या तेराव्या कवितासंग्रहाच्या सात प्रती कव्हर घालून दिल्या जातील. (केवळ कव्हर्स फुकट मिळतील, पुस्तकांची किंमत आकारली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.)) या कवितेतील कोणत्याही घटनेचा वास्तव घटनांशी संबंध नाही. (खरेतर कवितेतील एका घटनेचा कवितेतीलच दुसऱ्या घटनेशीही काहीच संबंध नाही.) तसा तो आढळल्यास केवळ निव्वळ योगायोग समजावा. ही कविता रचताना, जनतेला कवीला काही संदेश सांगावयाचा आहे किंवा उपदेश करावयाचा आहे अशी भ्रामक कल्पना ओझरती देखील कवीच्या मनाला शिवली नाही. या कवितेतून जीवनाचा सखोल अगर व्यापक अगर दोन्ही प्रकारचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही याची खात्री आहे. पण त्यातूनही तसा प्रयत्न जर कोणी केलाच तर तो त्याला अगर तिला अगर दोघांनाही सापडणार नाही. कारण खुद्द कवीलाच तो सापडला नाही. तेव्हा जे आडातच नाही ते पोहोऱ्यात कुठून येणार? किंवा जे गच्चीवरच्या टाकीतच नाही ते नळात कुठून येणार? (हे वाक्य पाण्यासाठी ज्यांना आडवाट तुडवत जावे लागत नाही त्यांच्यासाठी आहे.) किंबहुना ही कविता वाचायला उगीचच जीवनाचे सखोल दर्शन वगैरे घेण्याच्या आडवाटेने जाऊ नये एवढीच कवीची इच्छा आहे...

त.टी.: कवीचे विश्वसनीय ज्योतिषी श्री. कु. ड. मुडे यांनी कवीला साडेसात हा आकडा लाभदायक असल्याचे सांगितले आहे.

त.टी.: त.टी. = तळटीप.

प्रस्तुत कविता ही दुवा क्र. १ ह्या ठिकाणी आधीच प्रकाशित झाली आहे. हे प्रास्ताविक लिहिताना पडलेल्या बौद्धिक उजेडात येथे कवितेचे पुनर्प्रकाशन व्हावे अशी कवीची इच्छा आहे...

त्याने मिशा पुसल्या...

नेहमीप्रमाणे आजही त्याचा डावा सॉक पिंगट होता
झाडाची पानं तशीच सळसळा वाजत होती
फ्रुट सॅलडमध्ये घालायला आजही कवठ मिळालं नाही म्हणून
दाढीचे खुंट सातव्यांदा खाजवत त्याने डोक्याचा एक केस उपटला
सकाळपासूनच्या या तेराव्या केसाकडे एक दीर्घ कटाक्ष टाकला अन्
चहाचा पाचव्यांदा भुरका मारून त्याने मिशा पुसल्या...

त्याच अबोली रंगाच्या माकडटोपीची उसवलेली वीण पाहून
सतारीची तिसरी तार त्याने अलगद खाजवली
त्या आवाजाने बाहेर डुंबणाऱ्या म्हशींच्या डाव्या पायांवर शहारे उठले
'आज थंडी जरा जास्तच आहे' म्हणत तो पंखा पुसून उतरला अन्
चहाचा सातवा घोट घेऊन त्याने मिशा पुसल्या...

वाजवावी की नाही अशा संदिग्धतेतून बाहेर पडत त्याने टाळी वाजवली
तेवढ्यात पलिकडच्या कपाटावरून जास्वंद तेलाची बाटली पडली
तिकडे दुर्लक्ष करत अशोकचक्राच्या एकविसाव्या आऱ्याकडे पाहत
पडद्याला बाजूला सारून त्याने थोडी सूर्यकिरणे झेलली अन्
बशीत थंड केलेला चहा पिऊन त्याने मिशा पुसल्या...

आकाशात भराऱ्या मारणारा तो कावळा पाहून त्याला लाज वाटली
अचानक त्वेषाने उसळून त्याने स्वच्छ केलेला पंखा सुरू केला
पण टेलिफोनच्या आणि दरवाज्याच्या बेलमध्ये काहीच साम्य नव्हते
त्यामुळे गादीवरची चादर नीट करून तो चहा प्यायला निघून गेला
गेल्यागेल्या मगाशीच चहा संपल्याचे त्याच्या लक्षात आले आणि
भांडंभर नुसते पाणीच पिऊन त्याने मिशा पुसल्या...