वाटले बरे किती

भेटती जपून टवटवीत चेहरे किती!
सोबतीस आणती सुगंध  बोचरे किती!

मी अजून खरवडून चेहऱ्यास पाहतो
ह्या चऱ्यांशिवाय आत आणखी चरे किती?

प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?

झोपड्यांत राहती गुरे म्हणे समोरच्या
आलिशान सदनिकांत ह्या जनावरे किती?

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?

"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती!

घाव दाखवून मी तुझ्यासमोर नागडा
अन् तुला फिकीर लोंबतात लक्तरे किती?

चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?