मिनी स्प्रिंग रोल्स

  • कोबी,गाजर,सिमला मिरची-लाल,पिवळी,हिरवी अशा रंगीत असल्यास उत्तम,नसल्यास ज्या असतील त्या
  • सेलरीपात २ काड्या,पातीचे २कांदे+कांदापात
  • ह्या वरील सर्व बारीक चिरलेल्या भाज्या १.५ ते २ कप.
  • सोयासॉस,मिरपूड,चिलीगार्लिक सॉस(किवा मिरची+लसूण पेस्ट),मीठ,अजिनोमोटो - चवीनुसार.
  • स्प्रिंग रोल किवा एग रोल शीट्स (बाजारात तयार मिळतात.),एका अंड्यातील पांढरे.
  • तळणीसाठी तेल.
१ तास
४ ते ५ जणांसाठी

गाजर,कोबी किसणे.बाकीच्या सर्व भाज्या बारीक चिरणे.१कप पाणी उकळत ठेवणे. ह्या सर्व चिरलेल्या भाज्या पाण्यात घालणे.झाकण ठेवून वाफ आणणे. नंतर एका तसराळ्यावर सुती फडके घालणे आणि ह्या वाफवलेल्या भाज्या त्या फडक्यावर ओतणे.गाठोडे करुन पाणी पिळून टाकणे,शक्य तित़के पाणी पिळून टाकणे,जे पाणी खाली तसराळ्यात पडेल ते फेकून न देता व्हेज स्टॉक म्हणून सुपात,मांचुरीयन इ. च्या ग्रेव्हीत वापरता येते.घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवले तर एखाद दोन दिवस राहू शकते.लगेचच वापरण्याचीही गरज नाही.
आता ह्या भाज्या एका दुसर्‍या तसराळ्यात घेऊन त्यात चवीनुसार मीठ,अजिनोमोटो,मिरपूड घालणे,१चहाचा चमचा सोयासॉस,१ चहाचा चमचा चिलीगार्लिक सॉस/पेस्ट घालणे.चांगले एकत्र करणे.तिखट हवे असल्यास अजून चिली गार्लिक पेस्ट घालणे.सारण तयार झाले.
स्प्रिंगरोल शीट वर एका बाजूला हे सारण घालणे आणि शीटची गुंडाळी करणे.

DSC03422 DSC03421

रोल करताना घट्ट गुंडाळणे,अर्ध्यावर आल्यावर पाकिटाप्रमाणे दोन्ही बाजून बंद करणे ,त्यावर अंड्यातील पांढर्‍याचा हात लावणे,तिसर्‍या बाजूलाही अंड्याचा हात लावणे व तिसरी बाजू गुंडाळून रोल बंद करणे.

DSC03423 DSC03424
अंड्याचा हात लावल्याने रोल नीट बंद होतो व सुटत नाही,ज्यांना अंडे नको असेल त्यांनी पाण्याचा हात लावून बंद करावे पण अंड्यामुळे जास्त व्यवस्थित बंद होते.

DSC03427 DSC03429
तेल कडकडीत तापवणे आणि मोठ्या आचेवर बदामी रंगावर तळून काढणे आणि लगेचच सर्व्ह करणे. जास्त वेळ ठेवले तर ते मऊ पडतात.तेल कडकडीत तापलेले असणे जरुरी चे आहे,अन्यथा रोल तेल पितात.
तळण्याऐवजी रोल्सना तेलाचा हात लावून अवन मध्ये १५ ते २० मिनिटे १८० ते २०० अंश से. वर बेक केले तरी चालेल पण तळलेले रोल्स अर्थातच जास्त रुचकर लागतात.

१)हे रोल्स तयार करून फ्रिज करून ठेवू शकता आणि आयत्या वेळी तळून काढता येतात.फ्रिज केलेले रोल्स तळायच्या आधी १/२ ते ३/४ तास बाहेर काढून ठेवावेत आणि तळताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण रोल्स फ्रिज केले की थोडा पाण्याचा अंश त्यात असतो.

२)चिकन/मटण स्प्रिंग रोल्स - ह्या करता भाज्यांऐवजी चिकन/मटणखिमा वापरणे.बाकी साहित्य व कृती सारखीच.

माझे पाक प्रयोग