निरोप

थांब जराशी, चंद्र नभी मावळला नाही
प्राजक्ताने श्वेत सडा अंथरला नाही...
कुठे संपला झिम्मा ताऱ्यांचा आकाशी ?
रंग उषेने व्योमावर शिंपडला नाही...
रातकिड्यांनी कुठे छेडली, सखे, भैरवी ?
सूर विहंगांचा कानावर पडला नाही...
निशिगंधाचा अजून येतो मादक दरवळ
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलला नाही...
अजून जागा झाला नाही पहाटवारा
दवस्पर्शाने देह कळीचा खुलला नाही...
किती बोललो डोळ्यांनी, ओठां-स्पर्शांनी
शब्द निरोपाचा काही सापडला नाही...