वृत्तांबाबत थोडेसे...

.........मनोगत चे सर्व काव्यप्रेमी,

सप्रेम नमस्कार,

वृत्तांवरील या लेखाचे निमित्त आहे, `...लवकर ये` (२ एप्रिल २२०८) या माझ्या कवितेला मा. महेश यांनी दिलेले प्रतिसाद. या प्रतिसादांमधून त्यांनी यतिभंग, मात्रावृत्ताचे गण, अक्षरगणवृत्ते इत्यादी विषयांवर काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांबाबत काही लिहिण्याचा हा प्रयत्न...
गेल्याच्या गेल्या पिढीतील थोर कवी आणि प्रख्यात छंद(छन्द)शास्त्रकार डॉ.माधवराव पटवर्धन (कविवर्य माधव ज्युलियन) यांच्या छंदो(छन्दो)रचना या ग्रंथाचा आधार काही ठिकाणी घेत मी माझ्या मगदुरानुसार आणि वकुबानुसार वृत्तांबाबतची माहिती येथे सादर करीत आहे... या माहितीतून वृत्तजिज्ञासूंना, वृत्तसाक्षर होऊ इच्छिणाऱ्यांना काही चांगली माहिती मिळाल्यास त्याचे सारे श्रेय महेश यांना...! [...आणि हे वाचून कुणाला कंटाळा आल्यास, वृत्त या प्रकाराचा कुणी धसका घेतल्यास त्याचे पाप माझ्या माथी... :) ]

..........

महेशरावांनी विचारले होते की, मात्रा वृत्तातील यतिभंग कसा टाळायचा ? मात्रा वृत्ताचे गण कसे पाडायचे ? अक्षरगण वृत्तातील एखादे वृत्त कसे ओळखायचे ? इत्यादी...

शेवटच्या प्रश्नापासून सुरवात करू या  ः

अक्षरगण वृत्त ओळखायचे कसे ?

ही वृत्ते ओळखण्याची सोपी पद्धत अशी -

उदाहरणार्थ मंदाकिनी या वृत्तातील रचना घेऊ या...

दाही दिशा हिंडून मी आलो तु्झ्या दारी पुन्हा
जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा

मंदाकिनी हे नाव चारअक्षरी आहे. या रचनेतील पहिली चार अक्षरे घ्या. ती आहेत - दा ही दि शा - त्यांचा लघू-गुरू क्रम असा आहे  - - U - गुरू । गुरू । लघू । गुरू. मंदाकिनी या वृत्ताचा लघू-गुरू क्रमही असाच आहे  - - U -
गुरू । गुरू । लघू । गुरू.
मं (दा) दा (ही) कि (दि) नी (शा)...म्हणून वरील रचनेचे वृत्त आहे - मंदाकिनी. या नावाची चार आवर्तने या वृत्तात होतात. मंदाकिनी - मंदाकिनी - मंदाकिनी - मंदाकिनी. त्याचे गण - - U -, - - U -, - - U -,- - U - असे पडतात.

आता कलिन्दनंदिनी हे वृत्त घेऊ या -

निघायला हवे मला बरेच दूर जायचे !
इथे तिथे जिवास का उगीच गुंतवायचे !

कलिन्दनंदिनी हे नाव सहाअक्षरी आहे. वरील रचनेतील पहिली सहा अक्षरे घ्या. ती आहेत - नि घा य ला ह वे - त्यांचा लघू-गुरू क्रम आहे U - U - U - . लघू । गुरू । लघू । गुरू । लघू । गुरू. कलिन्दनंदिनी या वृत्ताचा लघू-गुरू क्रमही असाच आहे. U - U - U - लघू । गुरू । लघू । गुरू । लघू । गुरू.
क(नि)लि (घा) न्द () नं (ला)  दि ()  नी (वे)...म्हणून वरील रचनेचे वृत्त आहे - कलिन्दनंदिनी. या वृत्ताचे गण  U-U-, U-U-, U-U-, U-U- असे पडतात.

आता पाहू या स्रग्विणी हे वृत्त  -

जे नको तेच झाले कसे शेवटी ?
मी इथे एकटा, तू तिथे एकटी !

स्रग्विणी हे नाव तीनअक्षरी आहे. वरील रचनेतील पहिली तीन अक्षरे घ्या. ता आहेत - जे न को - त्यांचा लघू-गुरू क्रम आहे - U - . गुरू   । लघू  । गुरू  स्रग्विणी या वृत्ताचा लघू-गुरू क्रमही असाच आहे. - U - गुरू   । लघू  । गुरू. स्र (जे) {आता येथे स्र हा लघू दिसत असला तरी त्याच्या पुढे ग्वि हे जोडाक्षर असल्याने त्या अक्षराचा आघात आधीच्या अक्षरावर म्हणजेच स्र वर झाल्याने त्याचा दीर्घोच्चार होतो. परिणामी ते अक्षर गुरू ठरते. हा नियम लक्षात ठेवावा.} ग्वि () णी (को)... म्हणून वरील रचनेचे वृत्त आहे - स्रग्विणी. या वृत्ताचे गण - U -, - U -, - U -, - U - असे चार पडतात. वृत्तसाक्षरांना हे वृत्त राधिका राधिका राधिका राधिका या पद्धतीने माहीत आहेच.

अशी कितीतरी उदाहरणे देऊन वृत्तओळख करून देता येईल. पण सुरवातीला एवढी पुरेत... :)

येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की, वृत्त ओळखण्याचा सोपा मार्ग वर सांगितला असला तरी तो काही वृत्तांच्या बाबतीत फसवाही आहे.  :)

परत याच वृत्तांची उदाहरणे घेत उलट्या क्रमाने जाऊ या

१) स्रग्विणी या वृत्ताचे गण आहेत ः  - U -, - U -, - U -, - U -
लघू-गुरू-लघू असे चार. याच जातकुळीचे आणखी एक वृत्त म्हणजे भामिनी.
भामिनीचे गण पडतात ः - U -, - U -, - U -, आणि  - .यात शेवटच्या लघू-गुरूने सुट्टी घेतली आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच.

अशी वृत्ते ओळखण्यात सुरुवातीला गडबड झाली तरी सरावाने ती ओळखू येतात. शेवटच्या गणाकडे लक्ष ठेवले की झाले ! नंतर नंतर सरावाने सारेच येते.

२) आता कलिन्दनंदिनीच्या जातकुळीतील कोणते वृत्त आहे, ते पाहू या
कलिन्दनंदिनी या वृत्ताचे गण आहेत ः U - U -, U - U -, U - U -, U - U - लघू । गुरू । लघू । गुरू  असे चार.
याच जातकुळीतील आणखी एक वृत्त म्हणजे मृणालिनी. मृणालिनीचे गण पडतात ः  U - U -, U - U -, U - U -, U - U -, U - U -. या वृत्तात कलिन्दनंदिनीपेक्षा एक गण जास्तीचा पाहुणा म्हणून आलेला आहे,हे तुम्ही ओळखलेच असणार. कलिन्दनंदिनीपेक्षा एक गण जास्त एवढे मृणालिनीबाबत लक्षात ठेवले की झाले. याच जातकुळीची आणखीही बरीच वृत्ते आहेत. त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी.

३) आता वळू मंदाकिनीसदृश वृत्ताकडे.  मंदाकिनी या वृत्ताचे गण आहेत ः - - U-, - - U -, - - U -, - - U -.गुरू । गुरू । लघू । गुरू. मंदाकिनी याच वृत्तासारखे एक वृत्त आहे ते म्हणजे वैखरी. वैखरीचे गण पडतात - - U -, - - U -, - - U -. या वृत्तात मंदाकिनी वृत्तातील शेवटच्या गणाने राम म्हटले आहे ! बाकी वृत्त अगदी मंदाकिनीसारखेच. पण याचे नाव ठेवण्यात आले आहे त सुरुवातीच्या काही अक्षरांवरून नव्हे, तर सुरुवातीचे एक अक्षर वगळून जी तीन अक्षरे उरतील, त्या तीन अक्षरांवरून हे नाव ठेवण्यात आले आहे. उदाहरणार्थ ः मं -दा -कि- नी या शब्दातील सुरुवातीचे अक्षर मं  हे वगळून टाकायचे. उरतात अक्षरे दा-कि-नी (- U-)  म्हणजेच वै ख री (- U-). (किंवा असेही म्हणता येईल की, या वृत्तातील कोणत्याही रचनेतील, कोणत्याही ओळीतील शेवटची जी तीन अक्षरे, त्यांवरूनही हे वृत्त ओळखता येऊ शकते.)
मात्र, अशा वृत्तांची संख्या (ओळीच्या सुरुवातीच्या अक्षरांवरून नाव ठेवण्यात न आलेल्या) तुलनेने कमी आहे. हेही सरावाने ओळखता येण्याइतके सोपे काम आहे. त्यासाठी सजातीय वृत्तांचे गट लक्षात ठेवावेत, म्हणजे झाले !
याबाबत एक क्लृप्ती सांगावीशी वाटते - समजा मंदाकिनी आणि वैखरी या दोन्ही वृत्तांमधील एखादी रचना तुमच्यापुढे आली तर कोणती रचना कोणत्या वृत्तातील हे ओळखायचे असेल जे चार गणांचे ते मंदाकिनी आणि जे तीन गणांचे ते वैखरी. वियद्गंगा वृत्ताचेही असेच. हे वृत्त U - - - अशा चार गणांचे बनलेले आहे. पिनाकी हे वृत्तही अगदी असेच आहे; पण शेवटच्या गणातील गुरू हे अक्षर त्यात नाही.
वियद्गंगा ः U - - -  U - - -  U - - -  U - - -
पिनाकी ः U - - -   U - - -   U - - -   U - -
.........................

अक्षरगण वृत्ताची आणखी केवळ काही उदाहरणे माहितीसाठी देत आहे

१) आनंदकंद -

कवितेमधून माझ्या येतो सुवास माझा
एकेक शब्द आहे हा खास खास माझा

- - U - U - - - - U - U - -

२) व्योमगंगा -

ऐलतीराची कहाणी पैलतीराला स्मरेना
अन् तरीही आठवांचा पूर काही ओसरेना

- U - - - U - - - U- -  - U - -

३) चंचला

कालचा न रंग आज, कालचा न गंध आज
कालचा न सूर आज, कालचा न आज साज

- U - U - U - U - U - U - U - U

४) रंगराग

थांबलो कशाला मी, जायला हवे आता
गावही नवे आता, नावही नवे आता

- U - U - - - - U - U - - -

५) भुजंगप्रयात

स्मरू मी तुला की तुला विस्मरू मी ?
कळेना मला काय नक्की करू मी ?

U- -, U- -, U- -, U- -

६) वियद्गंगा

तुला घे चांदणे...अंधार राहू दे मला माझा !
तुला घे फूल...हा अंगार राहू दे मला माझा !

U - - - U - - - U- - - U - - -

................................

महेशराव यांचा दुसरा प्रश्न होता की,
मात्रा वृत्तातील रचनेचे गण कसे पाडायचे ?
- मात्रा वृत्तातील गण पाडण्याची ठरावीक अशी एकच एक पद्धत अस्तित्वात नाही. कारण प्रत्येक ओळीतील मात्रांची संख्या एकसारखीच असली तरी शब्दांचे लघू-गुरू क्रम सारखे नसतात. अनेकवेळा उच्चारणानुसार गण ठरतात  (शिवाय, त्या त्या कवीच्या काव्यवाचनाच्या शैलीनुसारही यात फरक पडू शकतो...!)

मात्रा वृत्तातील दोन रचनांची उदाहरणे येथे घेऊ ः

वणवण इतकी सवयीची झाली नंतर !
नको नको वाटत गेले मज माझे घर !

या ओळींचे गण मी असे पाडीन

वणवण । इतकी सवयीची । झाली नंतर !
नको नको । वाटत गेले । मज माझे घर !

पोचेन कधी का । मी अर्थांच्या । गावी ?
शब्दांशी जर । असाच खेळत । बसलो तर ?

दुसरे उदाहरण ः

पडझड झालेले गतवैभव मनात माझ्या !
आठवणींचा उदास उत्सव मनात माझ्या !

कितीकितीदा करू तरी मी जिवंत याला ?
पडून आहे मनाचेच शव मनात माझ्या !!

या ओळींचे गण मी असे पाडीन

पडझड । झालेले गतवैभव । मनात माझ्या
आठवणींचा । उदास उत्सव । मनात माझ्या

कितीकितीदा । करू तरी मी । जिवंत याला ?
पडून आहे । मनाचेच शव । मनात माझ्या !!

डॉ. माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांनी छन्दो (छंदो)रचना या आपल्या ग्रंथात गण यासंदर्भात जे विचार मांडले आहेत, ते य़ेथे दिल्यास, मी वर जे म्हटले आहे, ते अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल, असे वाटते.
ते म्हणतात - गण म्हणजे चरणाचा स्वाभाविकपणे पडणारा भाग होय. पद्य जर आवर्तनी असेल तर चरणांत ठराविक कालांत उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांचे जे गट पडतात, ते स्वाभाविक गण होत. हे सदैव एकाच अक्षरसंख्येचे किंवा लगक्रमाचे कसे असतील ?

................................

महेशरावांनी असेही विचारले होते की - मात्रावृत्तांतील यतिभंग कसा टाळायचा ?

याचे सोपे उत्तर असे देता येईल की, गण व्यवस्थित पाडून !!!  यतिभंग टाळता नाही येणार; पण गण व्यवस्थित पाडले तर तो झाकता मात्र जरूर येईल. :)    
- यतिभंग हा काही फार मोठा दोष कोणत्याच काव्यशास्त्रकाराने मानलेला नाही. कोणत्याच कवीनेही नाही!!! ओळी सुचण्याचा ओघच इतका वेगवान असतो की त्या ओघात अनेकदा मोठमोठ्या कवींच्या रचनांमध्येही यतिभंगाचा (म्हटलाच तर) दोष राहून गेलेला आढळेल. यतीचा भंग हास्यास्पद जागी होऊ नये म्हणजे झाले ! यतिभंग होताना अर्थाचा अनर्थ होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक असते. तुम्ही त्या ओळीचे गण ठीकठाक पाडलेत, तर यतिभंगाचा दोष (?) बेमालूमपणे झाकला जाऊ शकतो.

उदाहरणार्थ ही ओळ घ्या
पडझड । झालेले गतवैभव । मनात माझ्या

आता या ओळीत यतिभंग झाला आहे, हे उघडच होय.

या ओळीचे गण मी जर

पडझड झा । लेले गत वै । भव मनात । माझ्या  

असे पाडले तर साहजिकच ते हास्यास्पद ठरेल आणि निरर्थकही वाटेल; पण गण पाडतानाच असे पाडायचे की उच्चारणासही सोपे पडतील, यतिभंग (झालेला कळला) तरी पण तो खटकणार नाही आणि तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याचा अर्थ, आशयही श्रोत्यापर्यंत नीट पोहोचेल...ही तारेवरची कसरत असते खरी; पण (डोंबारणीच्या लहान मुलीप्रमाणेच !) ती साध्य होते, ती सरावानेच !

................................

कवी, गझलकार एखाद्या वृत्तात रचना करतो आणि वृत्तजिज्ञासूकडून किंवा छंदोबद्ध कवितेच्या क्षेत्रात नव्यानेच आलेल्या, येऊ पाहणाऱ्या कवीकडून प्रश्न विचारला जातो की, ती अमूकतमूक कविता वाचली, गझल वाचली, पण तिचे वृत्त कोणते ? (येथे विचारणाऱ्याला त्या वृत्ताचे नाव विचारायचे असते. पण गंमत अशी असते की, लिहिणारा तर लिहून जातो, पण त्यालाही अनेकदा त्या वृत्ताचे नाव माहीत असतेच असे नाही !!! आणि ते साहजिकही आहे.

उदाहरणार्थ ः

कालचा न रंग आज, कालचा न गंध आज
कालचा न सूर आज, कालचा न आज साज

या ओळी मला सुचल्या़; ही कविताही मी पू्र्ण केली. अक्षरगण वृत्तातील या रचनेत लघू-गुरू क्रम सांभाळले की झाले...पण या वृत्ताचे नाव चंचला आहे, हे मला या लेखासाठीची पूर्वतयारी करीपर्यंत माहीत नव्हते. छन्दो(छंदो)रचना हा ग्रंथ चाळल्यावर कळले की, आपल्या या कवितेचे वृत्त चंचला हे आहे !

{असे असले तरीही छंदोबद्ध कविता लिहिणारा कवी वृत्तात बिनचूक लिहीत राहत असतो. कारण - वृत्तात लिहिण्याचा सराव; तसेच त्याच्या कानावरून गेलेल्या, डोळ्यांखालून गेलेल्या, मनात मुरलेल्या जुन्या पिढ्यांमधील मोठमोठ्या विविध कवींच्या अनेकविध वृत्तांमधील रचना}. 

................................

या [ किचकट :) ]लेखाची सांगता एका गमतीदार किश्शाने ः

एक (पढिक)कवी मागे एकदा मला भेटला. वृत्तांवर, छंदांवर, गेय कवितेवर आमच्या गप्पा झाल्या. वादही झडले.  वृत्तांवरील बरीच पुस्तके त्याने वाचल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवत होते. त्याची एक महत्त्वाकांक्षा होती, (म्हणजे आजही असेल; महत्त्वाकांक्षा कधी मरत नसतात...!!!) ती म्हणजे, मराठीतील बहुतेक सगळ्या वृत्तांमध्ये कविता लिहून काढायच्या (हो, लिहून काढायच्या, हे त्याचेच शब्द ! धुऊन काढायच्या नाही म्हणाला, हे नशीब; माझे नव्हे, कवितेचे !!!). मी माझ्या परीने त्याला समजावून सांगितले की, अरे बाबा, असे नसते, तसे नसते, कवितेत ठरवून काही करता येत नाही वगैरे...
मी त्याला म्हटले की, आता समज, एखाद्या कवीला त्याच्या मृत आईवर, तिच्या आठवणींवर कविता, गझल सुचली तर त्या सुचण्याच्या प्रक्रियेच्या वेळी तो असे म्हणेल का, की `चला, आईवरील आपली ही रचना आपण आता वियद्रंगा या वृत्तात लिहू या हं किंवा वियद्रंगा नकोच; कलिन्दनंदिनी हेच वृत्त या रचनेसाठी योग्य ठरेल...!` तू वृत्तात जरूर कविता लिही...पण आधी ठरवू नकोस की, या वृत्तात लिहीन नि त्या वृत्तात लिहीन...सगळ्या वृत्तांबाबतची भीमप्रतिज्ञा तर मुळीच करू नकोस...!
सकृद्दर्शनी तरी त्याला हे पटल्यासारखे वाटले...पण पुढची काहीच खात्री देता येत नाही; आणि महत्त्वाकांक्षी कवीची तर नाहीच नाही !!!

............