बदक आले हो अंगणी..

मार्च सरत आला की वसंताची चाहूल लागते. कोवळी, लालसर, लुसलुशीत इवली पालवी फुटू लागते, ट्युलिप्सच्या अस्फुट कळ्या दिसू लागतात, चिमुरडी रंगीत गवतफुले डोलू लागतात, मॅग्नोलियाच्या फिक्या गुलाबी कळ्यांनी फांदीनफांदी सजते. हिवाळ्यात गारठून, गुरफटून झोपलेली झाडेझुडुपेही आळस झटकून उठतात, एवढंच नव्हे तर सूर्यदेवही करड्या ढगांच्या जाड दुलईतून बाहेर येतात. कोपऱ्याकोपऱ्यांवरच्या अंगणात खुरपी घेऊन आजी आजोबा बागकाम करताना दिसतात, ५/६ वर्षाची त्यांची नात चिमुकल्या बादलीतून पाणी आणते आणि आजी कौतुकाने तिला स्ट्रॉबेरीला पाणी घालू देते. असे दृश्य सगळीकडे दिसू लागले की एप्रिलच्या मध्यापर्यंत आमचीही बागकामाची उर्मी उफाळून येते. मग मार्केटातून एरिकाची झुडुपे नाहीतर श्विगरमुटरची रंगीबेरंगी फुले आणून कुंड्या सजतात. (श्विगरमुटर= सासू, ह्या आकर्षक रंगीत फुलांना 'सासूची फुलं' असं का म्हणतात, काय माहित? )

आमच्या कॉलनीतल्या गच्च्यांचा पूर्ण कठडा सिमेंटच्या कुंड्यांचाच आहे आणि त्यात बारमाही हिरवे थुजा (ख्रिसमस ट्री) असतातच. पण वसंताची लागण आम्हालाही होऊन कुंड्यातून फुलझाडे सजायला लागली. रोज त्यांना पाणी घालणे, तण आले असले तर उपळून काढणे, इतर थुजांच्या कुंड्यातली मातीही खुरपून थोडी सैल करणे असे बागकाम मग सुरू होते. अशीच एक दिवस पाणी घालत होते तर कोपऱ्यातल्या बुटक्या थुजाच्या कुंडीतली माती बाहेर सांडलेली दिसली. मी तर अजून त्या कुंडीतली माती सैल केली नव्हती तरी कशी तिथली माती बाहेर आली असा विचार करत कुंडीच्या जवळ गेले तर ते झुडुपही विस्कटलेले होते. बहुतेक हेकरबाईंचा बोका असणार असा विचार करत पाणी घालत होते तर कुंडीत खड्डा केलेला दिसला. दुसऱ्या दिवशी परत त्याजागी पाहिले तर त्या खड्ड्यात एक अंडे! मातकट रंगाचे, साधारण कोंबडीच्या अंड्याएवढे अंडे होते. घरटं वगैरे न बांधता एका कुंडीत खड्डा करून घातलेले अंडे पाहून जरा नवलच वाटले. कोणाचे असावे बरं? असा विचार करून दुसऱ्या दिवशी परत तिथे पाहिले तर आता अंड्यांची जोडी! आमची उत्सुकता आता ताणली गेली होती. कोणत्या पक्षाने ही कुंडी अंडी घालायला निवडली आणि घरटं न करता नुसता एक खड्डा करून त्यात अंडी घातली हे काही समजत नव्हतं. [float=place:top;font:vijayB;background:2596BC;color:ffffff;]तिसऱ्या दिवशी अधिरतेनंच पाहिलं तर एक बदकीणबाई आमच्या त्या झुडुपातल्या खड्ड्यात पंख फुलवून बसल्या होत्या. [/float]आमच्या पहिल्या मजल्यावरच्या गच्चीतली कुंडी या बयेनं अंडी घालायला कुठे आणि कशी शोधली? कुतुहलाने आम्ही हैराण झालो आणि गंमतही वाटली.

आमच्या घराच्या मागून लहानशी निडा नदी अनेक बदकांना घेऊन वाहते, तिच्यावरूनच आमच्या गावाला निड म्हणतात. ती माइनला मिळते. तिच्या दोन्ही काठांना सायकल आणि जॉजिंग, वॉकिंग ट्रॅक्स केलेले आहेत, तिथे आम्ही बरेचदा फिरायला जातो. फिरायला येणारे कित्येकजण त्या बदकांना पाव, बिस्किटं घालतात आणि पाण्यातली बदकं, हंस काठावर येऊन धीटपणे पाव, बिस्किटांचे तुकडे वेचतात हे नेहमीचंच दृश्य! आम्हीही कितीतरीदा त्यांना खाऊ दिला होता; त्या अनुभवावर हिलाही मी पोळीचे तुकडे देऊ केले. ही बया तुकड्याला चोच लावेना म्हणून जरा लांब, तिला न दिसेलशी उभी राहिले पण ही आपली पिसात खुपसलेली चोच बाहेर काढायला तयार नाही. खाईल नंतर असा विचार करून आत आले. थोड्या वेळाने पाहिले तरी पोळीचे तुकडे तसेच!आजीला ही बातमी दिल्यावर कॉलनीभर ती पसरणार होतीच! आणि तसंच झालं, संध्याकाळीच काळेबाईंचा फोन आला. काळेबाई म्हणजे श्रीमती‌ श्वार्झ. श्वार्झ =काळा म्हणून आम्ही आपसात बोलताना त्यांना काळेबाई म्हणतो. त्यांचं म्हणणं असं की ती बदकीण त्यांच्या गच्चीत गेले २, ३ वर्ष एप्रिलच्या मध्यावर अंडी घालायला येते, ह्या वर्षी तिची वाट पाहत अजून कशी काय आली नाही? अशा विचारात असतानाच आजीने बातमी पुरवली होती. आणि बदकीण इंडियन ब्रोट खात नाही हे कळल्यामुळे अस्वस्थ होऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच एक मोठी बागेतली छत्री आणि दुसऱ्या हातात पावाची लादी घेऊन काळेबाई हजर!

कडक उन्हं आणि अंडी, पिल्ले इतर पक्षांच्या भक्षस्थानी पडू नयेत म्हणून ह्या मोठ्या छत्रीचे संरक्षण आवश्यक आहे असे ठासून सांगत असताना आम्ही ते छत्र तिच्यावर धरले. ते एकदा मनासारखे धारण झाल्यावर एका वाडग्यात पाणी घेऊन आपल्याबरोबर आणलेला पाव त्यात भिजवला आणि प्रेमाने बोलत, लाड करत फ्राऊ एंटला म्हणजेच बदकिण बाईंना काळेबाई खाऊ घालू लागल्या. व्हाईट ब्रेड पाण्यात भिजवून तिला देत जा, मी येतच जाईन अधून मधून असा सल्ला देऊन काळेबाई निघून गेल्या. बदकिणीची, नव्हे नव्हे एंटबाईंची जबाबदारी आता माझ्यावर आली होती. काळेबाईचा तिच्याशी चाललेला प्रेमळ संवाद आणि त्याला तिने दिलेला रिस्पॉन्स पाहता माझ्या लक्षात आले की ह्या जर्मन बदकिणीला बहुदा माझे मराठी आणि मराठी पदार्थ अनोळखी असतील, पोळी हा खाण्याचा पदार्थ आहे हेच तिला समजले नसावे. दुसऱ्या दिवशी ही बया मी जर्मनमध्ये बोलायला लागल्यावर रिस्पॉन्स द्यायला लागली की! मग म्हटलं अरे, अनेक जर्मनांना भारतीय खाण्याचं वेड लावलं आहे तर ये बदक क्या चीज है? हिला पण पोळी खायला घालायचीच.. आणी ४, ५ दिवसांनी पावाइतकीच ती पोळीही खायला लागली.

पहाटे लवकर आणि संधीप्रकाशात एखाद दोन तास फक्त ती हे आपले तात्पुरते घरटे सोडून नदीत जाऊ लागली. ती कुंडीत नसताना एकदा आम्ही अंडी मोजली. आता ती ११ झाली होती आणि काटक्या, चिंध्यांनी तिच्या घरट्याचे इंटिरियर डेकोरेशन केलेले दिसत होते. दिवस जात होते, दिवसभर पंख फुलवून आणि अंग फुगवून ती बसलेली असे, कोणालाही जवळ येऊ देत नसे. मी सुद्धा तिला खाणे देऊन झाल्यावर तिथे जरा जास्त रेंगाळले तर ती आक्रमक होत असे. मी आणि काळेबाईच फक्त तिच्या घरट्याजवळ जाऊ शकत होतो‌‌. आजी एंटबाईंसाठी खाऊ पाठवत होती. शेजारच्या हेकरबाई, क्रोबेकर आजी, पलिकडची पाँचलेगल सगळ्यांची कुतुहलयुक्त चौकशी चालू होती. किती अंडी आहेत? पिलं कधी बाहेर येणार? ती नदीकडे कशी नेणार पिलाना? मला तरी कुठे माहित होतं?

"अंडी उबायला साधारण ४ आठवडे लागतात. आणि सगळी पिलं एकदम नाही बाहेर येत हं, आणि मग एकदा पिले बाहेर आली की त्यांना ती हळूहळू उडायला शिकवते आणि मग नीट उडता येते असे तिला वाटले की साधारण पहाटेच त्यांना ती नदीत नेते. घरट्यापासून नदीत जाईपर्यंत फार काळजी घ्यावी लागते कारण मोठे पक्षी झडप घालायला टपलेलेच असतात.. " काळेबाईंचा अनुभव बोलत होता. "अगदी पहिल्या वर्षी २, ३ पिलं टिपली ग पक्षांनी, मग मीच नेऊन सोडलं इतरांना नदीत. पण मागच्या वर्षी मे महिन्यात एकदम थंडी वाढली ना, मे चा शेवट आला तरी अंडी उबलीच नाहीत ग.. एक दिवशी पाहिलं तर सगळी अंडी फोडून ती निघून गेली होती.. ह्या वर्षी तरी सगळं नीट होऊ दे. " बाळंतपणाला आलेल्या मुलीची आईच बोलत होती जणू..

आणि एक दिवस इवलाली दोन पिले दिसायला लागली. हळूहळू ती कुंडीतून उडी मारून बाहेर आली. आई बदक आता दिलेला पाव, पोळ्या पिलांच्या चोचीतही भरवत होती. एके दिवशी दोनाची एकदम ५, ६ पिले झालेली दिसली. पिलं गच्चीभर बागडायला लागली, त्यांना हेकरबाईंचा बोका आणि मोठे पक्षी ह्यांच्यापासून वाचवण्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागू लागले. असे अजून ४, ५ दिवस गेले. पिलांची संख्या आता आठाच्या वर गेली होती. आता त्यांना नदीत सोडणं गरजेचं होतं. काळेबाई एक जाळीचं गोणतं घेऊन आल्या आणि सगळी पिलं त्यात भरली. आई बदक अस्वस्थ आणि आक्रमक झाली होती पण काळेबाईंना ती थोडीतरी दाद देत होती. कितीही झालं तरी गेली तीन एक वर्षे तिच्या पिलांना नदीपर्यंत त्यांचीच साथ होती. मग आमची वरात नदीकडे निघाली. नदीच्या प्रवाहात पिलं सोडली आणि लाटांवर स्वार होऊन ती चिमुकली डोलूही लागली.

तेव्हापासून एप्रिल उजाडला की एंटबाईंची हटकून आठवण येतेच.