माझे अभावाचे विश्व...!

................................................

माझे अभावाचे विश्व...!

................................................

काल होतीस प्रेयसी
आज आहेस माऊली
पण थंडावा वेगळा...
जरी तशीच साउली !!

बरे झाले, भेटलीस...
थांबलीस क्षणभर
गजबजले मनाचे
माझ्या सुने सुने घर!

प्रौढपणातही तुझ्या
चमकले चार क्षण
पोरसवदेपणा तो...
तेच अवखळपण !

होती तुझ्या कडेवर
कळी एक रांगणारी
तुझ्यासारखीच मूक...
पण सारे सांगणारी !

कधी खोटे दटावणे
कधी मायेची पाखर
कधी कडवा कटाक्ष
कधी ओठांत साखर !

प्रेयसीतली माऊली
माऊलीतली प्रेयसी...
अशा एकाच वेळेला
दोघी ठसल्या मानसी !

तुला भेटून बघून
मला काय लाभ झाला ?
दिसेनाशी होताच तू
माझ्यापुढे प्रश्न आला...

तुझ्या दोन्ही दर्शनांनी
फूल धन्यतेला आले...!
माझे अभावाचे विश्व
किती भावपूर्ण झाले...!!

- प्रदीप कुलकर्णी

................................................

रचनाकाल ः १४ फेब्रुवारी २००५

................................................