एक भीषण भाषण...

सभ्य स्त्री पुरुषहो,
      आज तुमच्यासमोर उभं राहून बोलताना, काय बोलावे हा प्रश्न मला पडला आहे. सध्या जग एका वेगळ्याच आंबवण्याच्या प्रक्रियेतून जात आहे. जग हे प्रसरण पावत आहे त्याच प्रमाणे जगाचे एका लहान खेड्यात रुपांतर होत आहे अशी परस्परविरोधी विधाने करुन लोकांची दिशाभूल केली जाते. अर्थात यामागे कुणाचा हात आहे हे आम्ही जाणतो आणि त्यांचा पूर्णपणे बिमोड करण्याचे आश्वासन मी तुम्हाला देते. मात्र सध्या आपल्या समोर एक वेगळाच प्रश्न उभा आहे आणि त्या अनुषंगाने आपले आंतरराष्ट्रीय धोरण काय असावे याचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.  हीऽऽ, कशाने मंदी आलीऽऽ? हाच तो प्रश्न होय. या प्रश्नाचे उत्तर देण्यास मात्र मी असमर्थ आहे.
           जगाच्या राजकीय पटलावर भारत आणि चीन यांचा उदय होत आहे हे तुम्ही जाणताच. त्यामुळे जगाचे सत्ताकेंद्र पूर्वेकडे सरकत आहे असा प्रचार काहीजण करत आहेत. असा खोडसाळपणा करणाऱ्यांचा देखील बंदोबस्त करण्यात येईल. लोकांना वाटते आता आमचे दिवस भरत आले आहेत. म्हणजे आता अमेरिकेचे दिवस भरत आले आहेत, असे लोकांना वाटते असे मला म्हणायचे होते. असो. या म्हणण्याला पुष्टी देतील अशा कित्येक बाबी समोर दिसत असल्या तरी ही परिस्थिती सुधारण्याची संधी तुम्ही मला द्याल अशी मला खात्री आहे.
         सगळ्या जगात महागाईचा भडका उडालेला आहे आणि भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आपल्यासारख्या एवढ्या समृद्ध देशाला आणि पर्यायाने तुम्हाला देखील याची झळ बसावी ही खरंच शरमेची बाब आहे. पण तुम्ही देखील जरा सहानुभूतीने या बाबीचा विचार करावा असं मी तुम्हाला कळकळीने सांगते. अहो जिथे टोनी बेअर यांनादेखील एवढी झळ बसत असेल तिथं तुमचा काय पाड लागणार? कालच मी श्रीमती बेअर यांना फोन लावला होता. हो! मी फोन बऱ्यापैकी वापरते कारण फोनचं बिल खूप आलं तरी ते पक्षाच्या खर्चात लावता येतं. हा तर मी काय सांगत होते? हां, तर फोनवर श्रीमती बेअर म्हणाल्या की त्यांनी नेहमीप्रमाणे श्रीयुत बेअर यांना ग्रोसरीत काहीबाही आणायला पाठवलं होतं, पण महागाई एवढी वाढलीय की नुसतं ब्रेड बटाटे घेण्यातच त्यांच्याकडचे पैसे संपले. त्यांना वाटलं कुणाला काही न कळता आपण घरी पोहोचू. पण कसलं काय, ट्रेनीत चढतानाच टिसीने पकडलं आणि त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. अशी ही महागाई सगळीकडेच वाढलेली असताना आपला देशच मग याला कसा अपवाद राहणार?
       माझी मैत्रीण कोंदूलिझा म्हणते त्याच्याशी तर मी पूर्णपणे सहमत आहे. भारत आणि चीनमुळेच एवढी अन्नधान्याची जागतिक टंचाई निर्माण झाली आहे. तुम्हाला माहित आहे का की भारतातले बरेच लोक आता अर्ध्या चपातीऐवजी पाऊण चपाती खातात आणि जे चपाती खात नाहीत ते भाकरीच्या चार तुकड्यांऐवजी सहा तुकडे खाऊ लागले आहेत. मग टंचाई होईल नाहीतर काय? बिच्चाऱ्या कोंदूलिझाची तर खूपच कोंडी झाली आहे! बिचारी कोंड्याचा मांडा करुन कसंतरी भागवत आहे. उगाच आडनाव राईस असलं म्हणून राईस काय फुकट मिळतो का?
      अशा या महागाईचा मी ताबडतोब निषेध नोंदवते. आपल्या बायाबापड्यांवर पण किती आपत्ती ओढवली आहे याची तुम्हाला कल्पना नसेल. अहो आपल्या देशातल्या पोरीबाळींना आता पोटापाण्यासाठी भारतात जाऊन, तोकड्या कपड्यात कंबर हलवून, अंगविक्षेप करुन पोट भरावं लागतंय. खेळ राहतो बाजूलाच आणि लोक त्यांच्याकडेच बघत बसतात. खरंच ही किती शरमेची गोष्ट आहे! या भारताकडून आपण आपली कामं आउटसोर्सिंगने करुन घेत होतो तिथं आपल्याच मुलींना आता काम करावं लागतंय. म्हणूनच जॉर्ज फुस् यांनी आपल्याला पण दोन मुली आहेत या भावनेने या बाबीचा विचार केला तर बरे होईल.
     बाकी नुकत्याच एका प्रकरणात भारताची जी नाचक्की झाली ती योग्यच झाली. आपलेच दात आणि आपलेच ओठ असूनही, मैदानावर 'अ-शांत' वर्तन केल्याबद्दल त्यांच्या खेळाडूला शिक्षा केल्याबद्दल मी भारताचे अभिनंदन करते. त्याच खेळाडूने अँड्र्यू डायमंडस् याला मनुष्याचा पूर्वज असे हिणवले होते तेव्हा मला देखील खूप वाईट वाटले. भारत ऑस्ट्रेलिया संबंध तेव्हा माकडाच्या शेपटीसारखे ताणलेले होते. अर्थात अमेरिका क्रिकेट खेळत नसल्याने मध्ये हस्तक्षेप करण्याची संधी आम्हाला गमवावी लागली. लोकहो, तरीदेखील भारतासारख्या देशाकडून पण बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांचेच अनुकरण करत मी देखील तुम्हाला सरसकट कर्जमाफी देऊन सबप्राईमच्या पेचातून सोडवण्याचे आश्वासन देते. मात्र यासाठी तुम्ही माझे सहकारी 'खुराक' यांना मते न देता मलाच निवडणूकीसाठी निवडून दिले पाहिजे. तुम्ही जर एवढं मनावर घ्याल आणि तुमच्या पाठिंब्याने मी निवडून आले तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सभ्य स्त्री पुरुषहो, पुन्हा एकदा सांगते, काळ मोठा कठीण आला आहे. पूर्वी होते त्यासारखे दिवस आता राहिलेले नाहीत. शेवटी जो काय निर्णय घ्यायचा तो तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही मला निश्चितच संधी द्याल अशी आशा करते. जय अमेरिका!

खुलासा:  ग्लोबल वॉर्मिंगने तापले नसेल एवढे वातावरण सध्या अमेरिकेत तिथल्या निवडणुकांमुळे तापले आहे. तिथल्याच एका प्रचारसभेत श्रीमती हिलरी क्विंटल यांनी केलेले हे भाषण, काल रात्री दीड वाजता 'कब तक?' या वाहिनीवरुन गुप्तरित्या प्रसारित करण्यात आले. 'खली'बद्दलचा कार्यक्रम संपल्यावर (होय! डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूएफच्या भारतातील प्रसारणाचे हक्क 'कब तक?' वाहिनीला देण्यात आले आहेत) हे भाषण लागले होते. तुमच्यापैकी कुणीही हे भाषण ऐकले असल्याची सुतराम शक्यता नसल्याने सर्वांसाठी ते येथे देत आहे. भय्याकडच्या पाणीपुरीने ऐनवेळी प्रताप दाखवल्याने त्यावेळेस जागाच होतो. बाकी महाराष्ट्रातील भय्ये आणि त्यांच्या पाणीपुरीबद्दल स्वतंत्र लेख लिहता येईल! पण तूर्तास इतकेच...

-सौरभ