गझल

ना कुणी कल्याणकर्ते शेष आता
राज्यकर्ते लांडगे वा मेष आता

शेत सुकले, कर्ज थकले, मॉल सजले
केव्हढा बदलून गेला देश आता

बैल जो बसला, पुन्हा उठलाच नाही
वैरणीचा राहिला ना लेश आता

आदिवासींनो*, नका राहू उपाशी
शासनाने काढला आदेश आता

एकही नाही कुपोषित मूल येथे
पोटभर मिळतात अध्यादेश आता

राहिली लोकांस ना ऊर्मी लढ्याची
राहिला नाही जुना आवेश आता

नाग बसले व्यापुनी सहकारयमुना
कालिया सारे, कुणी ना शेष आता

सांगली, बारामती, लातूर, करविर
यापुढे उरला नसे का देश आता ?

* -> "आदिवासींनो" बरोबर आहे की 'आदिवाशांनो' हवे याबद्दल कोणी खुलासा करेल का?