प्रवास !

.....................
प्रवास !
.....................

भेटले सारे कसे हे
दीर्घ मौनाचे प्रवासी...?
वाट संपेना... किती ही भोवती आहे उदासी !

चेहरे अंधूक सारे
दूरच्या ताऱ्याप्रमाणे
शब्द सारे मूक झाले स्तब्ध या वाऱ्याप्रमाणे !

तोल कैसा सावरू मी ?
हात कोणाचा धरू मी ?
सावल्यांपासून आता कोणती आशा करू मी ?

शेवटी आता स्वतःशी
चालला संवाद माझा...
लावतो धक्का मला मी ! ऐकतो मी नाद माझा !

चालले माझेच माझ्या
हे असे तंद्रीत सारे
वेगळी माझी दिशा ! हे वेगळे आहेत वारे !

- प्रदीप कुलकर्णी

.........................................
रचनाकाल ः १९ जानेवारी १९९९
..........................................