ठेवणे ठरवून काही!

एवढे माझ्यापरीने मीच आता पाळतो

ठेवणे ठरवून काही मीच आता टाळतो!

हार-जीतीशी असे काहीच नाही वावडे

खेळण्याचे काम माझे,खेळतो, मी खेळतो!

ना सुखाशी वैर माझे, हासतो मीही जरा,

दुःखही आले कधी तर, मी तयावर भाळतो!

मी प्रतीक्षांचाच होतो गाव झालो एकटा,

आज मी हे सोबतीचे चांदणे न्याहाळतो!

मी दुज्यांच्याही चुकांच्या खूप शिक्षा भोगल्या

त्या जुन्या निष्पापतेची आज पाने चाळतो!

भूतकाळाशी घरोबा, वर्तमानी सख्यही

अन भविष्याचे निनावी मी मनोरे जाळतो!

ठेवने ठरवून काही मीच आता टाळतो!