प्राणाची तुळस बहरते...!

.................................
प्राणाची तुळस बहरते...!
.................................

हळुवार तुझ्या स्मरणाने
प्राणाची तुळस बहरते... !
सांज घेउनी करी दिवा
हृदयाच्या आत उतरते... !

हा तुझ्याच गावामधला
गतगंधभारला वारा... !
हा तुझ्याच गगनामधला
शुक्राचा लोभस तारा... !

या मंत्रभारल्या वेळी
मी इथे एकटा नाही... !
हा तुझाचा वारा-तारा
या तुझ्या दिशाही दाही... !

ही शांत, सुभगशी संध्या
पण किंचित उदासवाणी... !
डोळ्यांच्या कडांवरीही
यायला बिचकते पाणी... !!

तू आत उमलशी माझ्या
हे सांजरंग ढळताना... !
तू आत उजळशी माझ्या
आसमंत काजळताना... !

तू नसूनसुद्धा असशी
प्राणाच्या तुळशीभवती... !
स्मरणांचे मंद कवडसे
थरथरती अन् लवलवती... !

- प्रदीप कुलकर्णी

.................................
रचनाकाल ः १९ फेब्रुवारी १९९८
.................................