... ज्ञाना!

............................
..ज्ञाना !
............................


वासनांनी गांजण्याआधीच तू गेलास ज्ञाना !
देह तू साऱ्या विकारांच्या पुढे नेलास ज्ञाना !

तू कधी रडलास का माता-पित्याच्या आठवांनी ?
लावली होतीस का रे तू कधी मुक्तीस माया ?
गुंतला होतास निवृत्तीत-सोपानात का तू ?
का तुला झाली नकोशी ऐन तारुण्यात काया ?

तू असे लिहिलेस... ज्याने अमृताला लाजवावे
घोट तू सारे कटू पण पचवले होतेस आधी !
`मोगरा फुलला` तुझा, मातीत तू रुजलास तेव्हा -
...आणि आम्ही समजलो की ही तुझी आहे समाधी !!

उंच तू गगनावरी नेलेस त्या वेलास ज्ञाना !

सोसली दुःखे जगाची कोणत्या योगामुळे तू ?
वेदनेलाही कसे तू मानले वेदाप्रमाणे ?
वादळांसंगे मनाची बंद तू केलीस ताटी...
चांदणे केलेस आगीचे कसे तू कोण जाणे...!

तू असा शतकानुशतके आमुच्या हृदयात जागा
यापुढेही आमच्या हृदयात तू शतकानुशतके...!
आजही छळवाद झालेला तुझा तो आठवे अन्
आजही बसतात आम्हा...तेच तेव्हाचेच चटके !!

जन्मला असशीलही तू...पण कुठे मेलास ज्ञाना ?

............

त्याग तू सारा कुणासाठी असा केलास ज्ञाना ?
............

- प्रदीप कुलकर्णी

.....................................................
रचनाकाल -२७ व २८ मे २००८
.....................................................