उन्हाळा सुसह्य करण्यासाठी संमोहन!?

(स्व)संमोहनाने उन्हाळा सुसह्य करता येईल का?

   यावर्षी उन्हाळा खूपच जाणवतोय. मुंबईत तापमान ३४-३५ अंश असले तरी अतिआर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहात असतात, त्यामुळे अजून त्रासदायक वाटते. महाराष्ट्रातील अन्य शहरांना या सुपरहीटचा (हा मटाचा शब्द) तडाखा अधिकच बसतो. मालेगाव, जळगाव, नागपूर,नाशिक आणि पुणे शहराचे तापमानही ३५ ते ४० अंशांपर्यंत गेलेले दिसते.त्यातच वीजेच्या भारनियमनामुळे पंखे बंद असतात.यामुळे घरात राहूनही उन्हाळा असह्य होतो आणि कधी एकदा मृगाचा पहिला  पाऊस पडतोय असे होऊन जाते.  
  उन्हाळा सुसह्य करण्यासाठी अनेक उपाय वर्तमानपत्रांतून येत असतात. उदा. भरपुर पाणी प्या, बाहेर जाताना डोके झाकून घ्या, गॉगल वापरा इत्यादि.पण मला एक वेगळा उपाय सुचवावासा वाटतोय, तो आहे स्व-संमोहनाचा!

मी संमोहनशास्त्राचे काही कार्यक्रम पाहिले आहेत. काही वर्षांपूर्वी एका शिबीरातही भाग घेतला होता. या प्रयोगांत संमोहनतज्ञ एका समूहाला संमोहित करतो. मग त्याच्या आज्ञेनुसार समूहातील कमी जास्त प्रमाणात संमोहित झालेली प्रत्येक व्यक्ती वर्तन करू लागते. संमोहनतज्ञ त्यांना कारले देतो आणि हे लोक ते गाजर समजून सहजपणे खाऊन टाकतात. त्यांना त्या कारल्याची कडू चव मुळीच कळत नाही. याच प्रकारे संमोहनतज्ञ सांगतो "खूप उकडत आहे" त्याबरोबर सर्वांना घाम आल्यासारखे वाटू लागते व सर्व अस्वस्थ होतात. मग तो लगेच सांगतो की उन्हाळा संपून आता हिवाळा सुरू झाला आहे. सर्वत्र बर्फ आहे. खूप थंडी पडली आहे. हे ऐकताच संमोहित झालेले सर्व थंडीने काकडू लागतात. त्यांचे हात,पाय,ओठ या काल्पनिक थंडीने थरथरू लागतात. सर्वजण हु हु हु असे करू लागतात. प्रेक्षकांना हे पाहून आश्चर्य वाटते. थोड्या वेळाने संमोहनातून बाहेर आणले जाते. तेव्हा त्यांना या सर्व अनुभवांचा विसर पडलेला असतो.

अशा प्रकारे स्व-संमोहनही (म्हणजे स्वतःच स्वतःला स्वयंसूचना देऊन संमोहनात नेणे) करता येते.
   काही मराठी मालिकांमधून किंवा हिंदी भयमालिकांधून संमोहन अर्थात हिप्नॉटिझम करून खून केल्याचे दाखवले जाते. कधी कधी याचा विनोद निर्मितीसाठीही मालिकांमधून उपयोग केलेला दिसून येतो.त्यामुळे संमोहनाबद्दल एक चुकीचे चित्र उभे राहिले आहे. वास्तविक हे एक शास्त्र असून वैद्यक शास्त्रात त्याला मान्यता मिळाली आहे.संमोहनाचे अनेक व्यावहारिक उपयोग आहेत. काही पाश्चात्य देशात विशेषतः दंतवैद्यक आणि प्रसूतीशास्त्र यात संमोहनाचा उपयोग केला जातो.
   मला याठिकाणी हे विचारायचे आहे की या शास्त्राचा उपयोग करून असह्य होत असलेला उन्हाळा सुसह्य करता येईल का? या अवस्थेत जाऊन वर सांगितल्याप्रमाणे "थंडी वाजत आहे किंवा गार वाटत आहे" अशी स्वयंसूचना जर मनाला दिली तर उकाडा मुळीच जाणवणार नाही. विशेषतः रात्री झोपताना अति उकाड्यामुळे अनेकांना झोप लागत नाही. अशांना हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकेल.

या प्रयोगाला कदाचित काही मर्यादा पडतील.प्रवासात किंवा घराबाहेर असताना हा प्रयोग करणे सुरक्षित ठरेल का? त्वचा उष्णता ग्रहण करीत आहे पण संमोहित मेंदुमुळे मात्र गार वाटते आहे, हे शरीरासाठी घातक ठरू शकते का? असे काही प्रश्न मनात येतात. याशिवाय स्वसंमोहन हे सहजसाध्य नाही. ते शिकून घ्यावे लागते, ही एक मर्यादा आहेच.पण ते प्रयत्नसाध्य नक्कीच आहे.

आपणापैकी कोणी संमोहनशास्त्र शिकले असतील अशांनी किंवा याबद्दल कोणाला अधिक माहिती असेल तर आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

धन्यवाद

- मंदार