अनिल विश्वास यांचा पाचवा स्मृतिदिन

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक महान संगीतकार, श्री. अनिल विश्वास, यांचा आज पाचवा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

     १९३५ साली 'बालहत्या' या चित्रपटाचे संगीतकार मधुलाल दामोदर मास्टर ह्यांचे सहायक म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच वर्षी 'भारत की बेटी' या चित्रपटाचे संगीतकार झंडे खान यांचेही ते सहायक होते. यानंतर आला तो संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट 'धर्म की देवी' (१९३५). तीस वर्षाच्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी जवळ-जवळ ८० चित्रपटांसाठी संगीत दिले. त्यांचा शेवटचा चित्रपट होता 'छोटी छोटी बातें' (१९६५). 'औरत' (१९४०, मदर इंडियाची मूळ आवृत्ती), 'किस्मत' (१९४३), 'गजरे', 'अनोखा प्यार' (१९४८), 'लाडली', 'जीत', 'गर्ल्स् स्कूल' (१९४९), 'तराना', 'आराम' (१९५१), 'दो राहा' (१९५२), 'वारिस' (१९५४), 'जलती निशानी' (१९५५) या चित्रपटांचे संगीत त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. मुकेश व तलत महमूद या गायकांना पुढे आणण्यात अनिल विश्वास यांचा मोलाचा वाटा होता. दूरदर्शनवरील आद्य महामालिका, 'हम लोग', हिचे संगीतही अनिल विश्वास यांचे.
     आजच्या ( व कालच्याही) पिढीतील फारसे कोणी अनिल विश्वास हे नाव ऐकले नसले तरी एके काळी हिंदी सिने-संगीताच्या क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जायचे. सार्वजनिक कार्यक्रमात ते शेवटचे दिसले ते काही वर्षांपूर्वी झी टीव्हीच्या 'सा रे ग म' स्पर्धेचे माननीय परीक्षक म्हणून. (तेव्हा या वाहिन्या होतकरू गायकांची गुणवत्ता SMSची द्रव्यरूपी संख्या मोजून न ठरवता पंडित जसराज, अनिल विश्वास, ओ. पी. नय्यर, इत्यादी दिग्गजांकडून पारखून घ्यायच्या.)