प्रेमभंग

चुंबनेही हातची राखून येते
ओठ हल्ली ती जरा मुडपून येते

भेटते रस्त्यात ती परक्याप्रमाणे
हास्यही तोलून अन् मापून येते

गर्व हा नाही बरा, लावण्यमित्रा 
वेळ अस्ताची कुठे सांगून येते

ती जणू होते घटोत्कच सांजकाळी
शस्त्र मायावी स्मृती परजून येते

मी उभा निःशस्त्र, शरणागत, पराजित
दैव घावांची रसद घेऊन येते

लागतो डोळा पहाटे मुष्किलीने
झोपही डोळा जणू चुकवून येते

रात्र असते पौर्णिमेच्या चांदण्याची
स्वप्न सरते, जाग येते, ऊन येते

वाटते की नीज कायमचीच यावी
स्वप्नवेळा प्रेयसी साधून येते

शाश्वती देऊ नये कोणी उद्याची
सावली सध्यातरी मागून येते

एकटेपण यापुढे छळणार नाही
सोबतीला दुःख आवर्जून येते...