बिहाईंड दि मास्क - एका सर्जनचे आत्मकथन

एका डॉक्टराचे आत्मकथन हा प्रकार आता नाविन्यपूर्ण असा अजिबात राहिलेला नाही. अरुण लिमयांच्या 'क्लोरोफॉर्म'पासून रवी बापटांच्या 'वॉर्ड नं ५, के ई एम' पर्यंत अनेक नावे डोळ्यासमोर येतात.

अनुभवांच्या वेगळेपणाच्या आधारावर म्हणायचे तर हे पुस्तक तसे वेगळे म्हणता येईल. पण मग तसे प्रत्येकाचेच आत्मचरित्र वेगळे असते. त्यापलिकडचे अजून काही, जसे क्लोरोफॉर्ममधल्या 'आतल्या' कहाण्या किंवा रवी बापटांच्या विस्तारित गोतावळ्यामुळे येणाऱ्या अनेकानेक रंजक हकीकती, जर असेल तर ते वाचून काहीतरी गवसले असे वाटते.

बिहाईंड दि मास्क या दृष्टीने बरेचसे उणे पडते. रंजक घटनांची कमतरता हे याचे कारण अजिबात नाही.

साठच्या दशकामध्ये एम एस करून अलिबागला जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ मुंजे दाखल झाले तिथपासून कहाणी सुरू होते. त्या काळात अलिबागला वीजच नव्हती! म्हणजे आसपासच्या गावांमध्ये होती, पण अलिबागला असलेल्या चुंबकीय वेधशाळेतली मोजमापे अचूक असावीत यासाठी जवळपास कुठल्याही प्रकारच्या विद्युतलहरी नसणे गरजेचे होते. "त्या नोंदी जगात सर्वात शुद्ध आणि अविकृत असत" असा पुस्तकात उल्लेख आहे. या 'शुद्ध'तेच्या हव्यासापायी अलिबागकर जिल्ह्याचे ठिकाण असूनही अंधारात काळ कंठीत होते.

अशा या ठिकाणी शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या विजेरीच्या प्रकाशात केलेल्या शस्त्रक्रिया, भर समुद्रात जाऊन एका अरबी धाऊवर एका स्मगलर कोळ्यावर केलेले अपेंडिक्सची शस्त्रक्रिया, मांडीवर एक इंच रुंद आणि नऊ इंच लांब आकाराचा वण शस्त्रक्रियेने करून घेतलेला आणि त्या वणात दडवून हिऱ्यांची तस्करी करणारा स्मगलर, मृत गर्भार स्त्रीच्या पोटातून काढलेले जिवंत मूल, विंचू चावल्यावर मांत्रिक काय उपाय करतो त्याचे निरिक्षण करून त्यातील विज्ञान समजून घेऊन त्यानुसार विकसित केलेली स्वतःची पद्धती, अलिबागसारख्या कुग्रामात केलेली हृदयावरची अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (आणि त्या शस्त्रक्रियेला त्याकाळचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ मुंज्यांना स्वतःची ओळख न देता सहज म्हणून हजर असणे), सदतीस किलोचे जलांड (हायड्रोसिल) वागवणाऱ्या रुग्णावर केलेली शस्त्रक्रिया अशी अनेकानेक प्रकरणे रंजक आहेत.

परंतू या सगळ्याला नीट गुंफणारे सूत्र असे नाही. त्यामुळे अलिबाग, जळगाव, ठाणे, इथले वेगवेगळे प्रसंग सरमिसळ होऊन समोर येतात. आत्मचरित्र हे कालक्रमानुसारच लिहिले गेले पाहिजे असा जरी दंडक नसला, तरी वाचकाला खुणा नि माहिती जुळवण्यासाठी ते सोयीचे पडते. किंवा मग आचार्य अत्र्यांच्या 'मी कसा झालो?' यामध्ये आहेत तसे वेगवेगळे भाग करून मग कालक्रमाला टपली मारली तरी चालते. इथल्या सरमिसळीने गोंधळायला होते.

दुसरे म्हणजे घडल्या घटना सांगितल्या अशी सरळधोट मांडणी असल्याने त्यातून डॉ सुभाष मुंजे यांच्या 'आत' डोकावता येत नाही. कितीही अभ्यास करून लिहिलेले चरित्र आणि आत्मचरित्र यात जो फरक असायला पाहिजे तोच इथे दिसत नाही. त्यामुळे या घटना डॉ मुंजे कुठेकुठे होते याची चौकशी करून तिथे हिंडून माहिती गोळा करून लिहिल्या असत्या तरी त्या फार वेगळ्या रीतीने उमटल्या असत्या असे वाटत नाही.

तिसरे म्हणजे जिथे डॉ सुभाष मुंजे यांच्या अंतरंगात थोडेसे डोकावल्यासारखे वाटते, तिथे जरा विचित्रच विधाने आहेत. "आणीबाणीच्या काळातली गोष्ट.... लोकशाहीचे सर्व पुरस्कर्ते जरी त्याविरुद्ध संघर्षासाठी उभे ठाकले होते, तरी मी मात्र त्याला सुवर्णपर्व म्हणायला तयार आहे!" "एक शासकीय अधिकारी म्हणूनही मला आणीबाणी पसंत होती. त्या काळात लोकशाहीच्या नावाखाली कामचुकारांसमोर अडथळ्याची शर्यत पार करावी लागत नव्हती". हेच मुंजे पुढे एका ठिकाणी त्यांची शासकीय अधिकाऱ्यांशी झटापट व्हायला येते तेव्हा "मी मुद्दाम ब्यूरोक्रॅट या शब्दाचा डिक्शनरीमधे काय अर्थ दिला आहे ते पाहिलं. तो निघाला, 'नोकरशाहीचा अ-कल्पक पदाधिकारी!'" असेही लिहून जातात.

तसेच कारण नसताना त्यांच्या पत्नीच्या जातीचा केलेला उल्लेख, आणि एका कार्यक्रमाच्या आधारावर त्या अख्ख्या जातीला दिलेला कार्यकुशलतेचा दाखला हेदेखिल अप्रस्तुत वाटते.

एका दिवसात ३६५ कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्याचा त्यांनी केलेला विक्रम निश्चितच स्पृहणीय आहे. पण त्या विक्रमाला कारण ठरले ते स्त्रीरोगतज्ञ डॉ पुरंदरे यांनी चांदवडच्या शिबिरात एका दिवसात केलेल्या २५० शस्त्रक्रिया! "मी ठरवलं की हा विक्रम आपण मोडायचा. आणि तोही कसा? तर याहीपेक्षा लहान गावात जाऊन आणि फक्त माझ्या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांच्या गटाने. काही कोणी प्रसिद्ध तज्ञ वगैरे बोलवायचे नाहीत..... मला दाखवून द्यायचं होतं की फक्त आमचे वैद्यकीय अधिकारी, शिकाऊ पदवीधर, यांच्यातही असं काम करण्याची पूर्ण क्षमता आहे. आम्हाला कोणा अ-शासकीय विशेषज्ञाच्या सोयी-सवडीवर अवलंबून राहण्याची काही एक गरज नाही".

आणीक एक म्हणजे रायगड जिल्ह्यातले विंचूदंशाचे प्राबल्य, त्यावरील त्यांनी विकसित केलेली उपचारपद्धती, त्या उपचारपद्धतीचे त्यांच्या सासूबाईंनी केलेले कौतुक (अलिबागचा अलिबाबा) हे सगळे त्यांनी लिहिले आहे. पण त्याच रायगडमध्ये त्यांच्यानंतर दशकभराने सरकारी डॉक्टर म्हणूनच गेलेल्या आणि विंचूदंश व सर्पदंशावर जागतिक कीर्तीचे काम केलेल्या डॉ बावस्करांचा उल्लेखही नाही.

चौथे म्हणजे काही ठिकाणी त्यांनी उगाचच वाचातप पाळल्याचे जाणवते. अलिबागला अखेर १९६२ साली वीज आली, आणि जिल्हा रुग्णालयात क्ष-किरण तपासणी यंत्र आणण्याचे ठरवले. त्यासाठी चुंबकीय वेधशाळेच्या अधिकाऱ्याकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' आणण्यात आले. पण प्रत्यक्ष यंत्र येण्याच्या वेळेला ते अधिकारी निवृत्त होऊन गेले होते. समारंभ ठरला, मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे होते, आणि वेधशाळेच्या नव्या अधिकाऱ्याने अडेलतट्टूपणा केला. मुंजे तिरीमिरीत त्याला टाकून बोलले आणि मामला चिघळला. शेवटी वेधशाळा म्हणजे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली. तिथे जिल्हाधिकाऱ्यांचेही काही चालेना. शेवटी अलिबागच्या नागरिकांचे शिष्टमंडळ घेऊन नगराध्यक्ष कुलाब्याच्या वेधशाळेत रात्री दोन वाजता पोचले. तिथल्या अधिकाऱ्यासमोर बाजू मांडताना आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी सिव्हिल सर्जन डॉ. मुंजे यांना खच्चून शिव्या घातल्या. अखेर परवानगी मिळाली. हे आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणजे नाव बदललेले खुद्द डॉ. मुंजेच! कुलाब्याच्या वेधशाळेतल्या अधिकाऱ्यांनी त्यांना कधी बघितले नव्हते याचा त्यांनी असा उपयोग करून घेतला.

पण त्या अधिकाऱ्याचे नाव सोडाच, मुख्यमंत्री कोण होते याचाही ते उल्लेख करीत नाहीत. प्रत्यक्ष समारंभात मुख्यमंत्री जिल्हा रुग्णालयाबद्दल एक अक्षरही बोलले नाहीत म्हणून सर्वांसमक्ष त्यांना "आपण दोन शब्द हॉस्पिटलबद्दल बोला. सर्व कर्मचारीवर्गाने अहोरात्र खपून सर्व तयारी केली आहे. जरा शाबासकी मिळाली तर बरं वाटेल" असे सांगण्याचे धाडस त्यांनी केले. पण मग ही मुग्धता कशाला ते कळत नाही.

पाचवे म्हणजे हे या पुस्तकाचा मूळ तर्जुमा इंग्रजीत लिहिला गेला. त्याचा अनुवाद प्रसिद्ध औद्योगिक मानसशास्त्रज्ञ शामला वनारसे यांनी केला. हे सगळे काय ते उमगत नाही. मुंजे ठाण्यामध्ये. वनारसे पुण्यात. डॉ मुंज्यांनी पंधरा दिवसांत या आठवणी इंग्रजीत लिहून काढल्या. मग शामला वनारसे कुणा नातेवाईकाच्या शुश्रुषेसाठी लंडनला जाऊन राहिल्या होत्या त्यांनी तिथे तो तर्जुमा नेला आणि फिरायलाही बाहेर न पडता हे भाषांतर केले. डॉ मुंजे यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वाबद्दल बोलायचा माझा अजिबात विचार नाही, कारण ते इंग्रजी पुस्तक मी पाहिलेले नाही. पण त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व मराठीवरील प्रभुत्वापेक्षा जास्त असेल असे समजणे अवघड जाते. या भाषांतर प्रकारात मग काही वाक्ये विजोड वाटू लागतात. "डॉक्टर म्हणजे आश्वस्त करणाऱ्या नात्याची शक्यता याऐवजी आपला 'बकरा बनवणारा' करारातला प्रतिपक्ष, असंच झालंय" किंवा "वैद्यकीय व्यावसायिकांना भुलवण्यासाठी चाललेले प्रकारही अखंड सुख, अखंड उपभोग, अखंड फायदा याच धारणा उभ्या करून फोफावतात. शिवाय स्पर्धेला अटकाव नसल्यानं उपलब्धता बेसुमार वाढली आहे". बिनदिव्यांच्या अलिबागेतून कारकीर्दीला सुरुवात केलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकाने या भाषांतराच्या द्राविडी प्राणायामाऐवजी थेट मराठीतून अभिव्यक्ती केली असती तर अधिक बरे झाले असते असे वाटून जाते. कदाचित सुरुवातीला उल्लेखिलेला विस्कळितपणाही टाळला गेला असता.

एकूण, वाचनीय आहे, पण संग्रहणीय म्हणता येणे अवघड आहे. सुभाष भेंडेंनी भरभरून प्रस्तावना लिहिली असली तरीही!

पहिली आवृत्ती - ऑगस्ट २००१

प्रकाशक - मॅजेस्टिक प्रकाशन

किंमत - १२० रुपये