येऊ कसा तुमच्यात मी?

येऊ कसा तुमच्यात मी? बोलू कसा तुमच्यात मी?
सांगेनही माझे मला, मावेन का माझ्यात मी?

हा मी मला शोधावया जाऊ कुठे, जाऊ कसा?
संपेचना हा शोधही, का एवढा अज्ञात मी?

मी कोंडले दुःखास या कोणास ना जाणू दिले
हे एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी

वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा?
का राहतो मागे तरी? का नेहमी पश्चात मी?

लाटा जशा ना थांबल्या हे मोजणे ना थांबले
नादावणे माझेच सारे पाहिले त्यांच्यात मी