दिवाळी अंक २००८

समस्त रसिक मनोगती सदस्य हो,
मनोगती प्रतिभावंतांना लिखाणाला जास्त वाव आणि रसिक वाचकांना साहित्य मेजवानी देण्याच्या उद्देशाने काढल्या जाणाऱ्या मनोगत दिवाळी-२००८ या अंकासाठी मनोगती लेखक-कवींकडून साहित्य  मागवण्यात येत आहे. या दिवाळी अंकाची रचना ढोबळमानाने अशी असेल:



१. कथा
(या विभागात कथा/गोष्ट या सदरात मोडणारे सर्व काही. )
२. लेख
(या विभागात वैचारिक/विनोदी/सामाजिक लेख असतील. )
३. अनुभव
(या विभागात अनुभव, प्रवासवर्णने, स्वतःसोबत/इतरांसोबत घडलेल्या/पाहिलेल्या एखाद्या घटनेचे वर्णन इ. लेखनप्रकार असतील. )
४. मला आवडलेले
(यात आपण वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण, गाण्याचे/कवितेचे/चित्रपटाचे रसग्रहण इ. असेल)
५. मुलाखती
(यात घेतलेल्या मुलाखती इ. असतील. )
६. पद्य विभाग
(यात पद्य या प्रकारात मोडणारे सर्व काही, उदा.  गझला, विडंबने, चारोळ्या, वात्रटिका, मुक्तके, मुक्तछंद इ. इ. प्रकाशित करण्यात येतील).
७. माझे मनोगत
(यात मनोगत संबंधी कविता, लिखाण, विडंबन, अनुभव यांचा समावेश असेल. )


मनोगती लेखक/कवींना हे आवाहन आहे की त्यांनी आपले पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेले व स्वलिखित लिखाण दि.  ३० ऑगस्ट पर्यंत संपादक मंडळास दुवा क्र. १ या पत्त्यावर विरोपाने पाठवावे.

लिखाण टेक्स्ट फायलीच्या स्वरूपातच पाठवावे. टेक्स्ट फाइल बनवण्यात अडचणी आल्यास लिखाण डॉक फाइल किंवा गूगल विरोपात थेट मराठीत लिहून पाठवले तरी चालेल.

साहित्य विरोपाने पाठवताना

'Subject :मनोगत दिवाळी अंक:कथा/कविता/लेख(जो आपल्या लिखाणाचा लेखनप्रकार असेल तो): लेखाचे/कवितेचे शीर्षक'

अशा विषयाने विरोप पाठवावा जेणेकरून लिखाणाचे वर्गीकरण करणे सोपे जाईल.

कृपया खालील गोष्टींची नोंद घ्यावी:

  • लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख: ३० ऑगस्ट २००८.
  • लिखाणात (शक्य तितके) शुद्धलेखनाचे नियम पाळलेले असावेत.
  • पाठवल्या जाणाऱ्या गद्य प्रकाराची लांबी(शब्द मोजणीत धरून, रिकाम्या ओळी मोजून नव्हे) किमान संगणक-पडद्याची (स्क्रोल न करता)उंची पूर्ण भरेल इतकी तरी, आणि कमाल (वाचकांच्या सहनशक्तीचा विचार करून) कितीही असावी.
  • कोणत्याही प्रकारचे लिखाण पाठवताना त्याची सॉफ्ट/हार्ड प्रत स्वतःजवळही ठेवावी.  
  • लिखाणात खूप जास्त प्रमाणात '.... ', '!! ', 'इमोटिकॉन्स/भावमुद्रा, उदा, D:) इ. ' टाकणे शक्यतो टाळावे.
  • मोठे गद्य लिखाण पाठवताना एकाच भागात पूर्ण पाठवावे. वेळेची अडचण असल्यास मनोगतावरील अप्रकाशित लेखनाचा पर्याय वापरून रोज थोडे थोडे लिखाण करून पूर्ण झाल्यावर एकदम पाठवल्यास उत्तम.  
  • पद्य आणि गद्य दोन्ही पाठवताना त्यात खूप अनावश्यक मोकळ्या ओळी नसाव्यात(उदा. समास १ ओळीऐवजी ३-४ मोकळ्या ओळी सोडून केलेला इ. ) 
  • या दिवाळी अंकात व्यक्त केलेल्या राजकीय/सामाजिक विचार/मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.  
  • जास्त प्रमाणात दर्जेदार लिखाण आल्यास निवडीत दर्जा चांगला असूनही काही लिखाणाची निवड न होणे शक्य आहे. निवडीचे निकष कोणताही पक्षपात न करता ठरवले व पाळले जातील व चांगल्या लिखाणाला न्याय द्यायचा प्रयत्न नेहमीच राहील.  
  • पाठवलेल्या लिखाणात संपादक मंडळाने आवश्यकतेनुसार शुद्धलेखन, अंकातली उपलब्ध जागा, राहिली असल्यास विरामचिन्हे इ. माफक बदल (लिखाणाचा आशय न बदलता)करण्यास लेखकाची परवानगी गृहीत धरलेली आहे.
  • आक्षेपार्ह लिखाण/काही इतर वाक्यरचना/व्याकरण विषयक संपादनाची गरज शक्यतो भासणार नाहीच अशी अपेक्षा आहे. पण जर भासलीच तर सदर लेखकाशी संपर्क साधून सल्लामसलतीनंतरच हे बदल केले जातील.
  • मनोगतावर दिवाळी अंकाशी संबंधीत घोषणा/लिखाण यापुढे 'दिवाळीमनोगत' या सदस्यनामावरुन केल्या जातील. आपल्या शंकांना उत्तरे, आपले व्यक्तिगत निरोपातून पत्रव्यवहारही फक्त याच सदस्यनामाशी व्हावा. प्रशासकांना अथवा सदस्यांच्या नावांनी असलेल्या त्यांच्या मनोगत खात्यांवर दिवाळी अंक संबंधित व्य. नि. पाठवू नयेत ही विनंती.
  • 'माझे मनोगत' हा खास भाग मनोगतावर/मनोगताचे संदर्भ असलेल्या लिखाणासाठी केला आहेच. तेव्हा लेखकांना विनंती की त्यांनी इतर विभागांसाठी लिखाण पाठवत असल्यास त्यात मनोगत संदर्भांचा उल्लेख करू नये. पूर्वसंदर्भ माहिती नसल्याने मनोगतावर नव्या असलेल्या सदस्यांचा/अ-मनोगती रसिक वाचकांचा दिवाळी अंक वाचताना गोंधळ उडू नये हा यामागचा एकमेव उद्देश.

विशेष आवाहन : मनोगताच्या दिवाळी अंक समितीकरता ज्यांना सहभागी व्हावेसे वाटते आणि ज्यांना 

१. अंकनिर्मिती : मुद्रितशोधन, संपादन, टंकलेखन, पत्रव्यवहार वगैरे.
२. सजावट: चित्रे, रेखाटने, व्यंगचित्रे
३. तांत्रिक मदत: (गरज भासल्यास)

यापैकी एखाद्या विभागात सहकार्य करायची इच्छा असेल तसा उल्लेख करून दिवाळीमनोगत या खात्याला व्य. नि. आजपासून आठ दिवसाच्या मुदतीत पाठवावा. या सदस्यांची नावे तूर्त जाहीर करण्यात येणार नाहीत

आपल्या भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे.
कळावे, लोभ असावा.
मनोगत दिवाळी अंक २००८
अंकसमिती