मृग लागले.

    ७ जूनला मृग लागले की मान्सूनचा पाऊस येणार हा अनुभव गेली अनेक वर्षे आपण घेतला आहे. पण मागील ५-१० वर्षात पावसाचे वेळापत्रक काहीसे बिघडले आहे. एखादा अपवाद सोडल्यास तो उशीराच आला आहे. यंदा मात्र पाऊस वेळेवर म्हणजे ७ जूनच्या आत येणार अशी अटकळ वेधशाळेने बांधली होती आणि तसा तो आलाही आणि देशभर विक्रमी वेळेत पोहोचलाही.

बिरबलाची गोष्ट

   पावसाच्या नक्षत्रांच्या बाबतीत बिरबलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. एकाने अकबराच्या दरबारात एक कूट प्रश्न घातला. २७ वजा ९ किती? सर्वांनी यात काय कठीण म्हणून अंकगणिताने सरळ उत्तर दिले १८. पण हे उत्तर अर्थातच चुकीचे होते. बिरबलाने मात्र या प्रश्नातील खोच बरोबर ओळखून योग्य तर्क लढवून उत्तर दिले २७-९=०. कारण एकूण नक्षत्रे २७, त्यातून पावसाची ९ वजा केल्यास पाऊस पडणार नाही. अर्थात दुष्काळ, पाणी नाही, अन्नधान्य पिकणार नाही. म्हणजेच शून्यावस्था. ही कथा किती खरी किती काल्पनिक हे माहित नाही पण यातून पावसाच्या नक्षत्रांचे महत्त्व अधोरेखित केलेले दिसते. असो.. मृग लागले की पाऊस सुरू होतो. ही नक्षत्रे लागतात म्हणजे काय होते ते पाहू.   

सूर्याच्या मृगनक्षत्र प्रवेशाचा क्रम
(टिचकी मारून मोठे चित्र पाहा.)

 प्राचीन काळापासूनच आपल्याकडे खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास असलेला दिसून येतो. रामायण - महाभारतात अनेक ठिकाणी ग्रह-नक्षत्रांचे संदर्भ दिलेले आढळून येतात. कोणत्याही दिनदर्शिकेवर नजर टाकली की लक्षात येते ७ जून पासून दर १३-१४ दिवसांनी सूर्याचा अमुक एक नक्षत्रात प्रवेश. वाहन अमुक अमुक असे लिहिलेले आढळून येते. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सूर्य विविध नक्षत्रांच्या पृष्ठभूमीवरून सरकताना दिसतो. ३६५ दिवसात २७ नक्षत्रे, म्हणजे दर १३. ५ दिवसाला एक या प्रमाणे सूर्य नवीन नक्षत्रात प्रवेश करतो. हिंदी चित्रपटातील एखाद्या प्रेमगीतात नायक नायिकांना केंद्रस्थानी ठेवून कॅमेरा त्यांच्या चहूबाजूंनी गरागरा फिरतो. तेव्हा नायक-नायिका स्थिर दिसतात आणि त्यांच्या सभोवतालची पार्श्वभूमीवर झाडे, डोंगर, आकाश असे दृश्य दिसते, अगदी त्याचप्रमाणे नक्षत्रे एका पाठोपाठ एक सूर्याच्या पृष्ठभूमीत जातात. सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे अर्थातच ती आपल्याला दिसू शकत नाहीत एवढेच. यालाच सूर्याचा नक्षत्रप्रवेश असे म्हणतात.  
      पावसाची विविध नक्षत्रे आणि संबंधित वाहन यावर मागे एकदा चर्चा केलेली असल्याने वेगळे लिहित नाही. आपण दिनदर्शिकेत पाहून वाहनानुसार पाऊस खरंच कमी किंवा जास्त पडतो का ते पडताळून पाहावे.
      मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त ही ती पावसाची नऊ नक्षत्रे. दिनदर्शिकेत मात्र चित्रा आणि स्वाती पर्यंत नक्षत्रे दिलेली असतात.