झकाझकीतून शेवटी....

ख्यातनाम हिंदी साहित्यिक शरद जोशी यांच्या एका कथेचे हे स्वैर भाषांतर आहे.

मी जिवंत होतो नि त्याच्यासमोर उभा होतो. पण मी आहे, आणि त्याच्यासमोर उभा आहे हे मानायचीच त्याची तयारी नव्हती. आणि त्याने ते मानल्याखेरीज मला निवृत्तीवेतनाचे पैसे मिळणार नव्हते.

"मी तुमच्या समोर प्रत्यक्ष उभा आहे" मी सुरुवात केली.

"पुरावा काय? "

"मी उभा असण्याचा? "

"नाही हो, तुम्ही असण्याचा. मला काय माहीत की जे कोण उभे आहे ते तुम्हीच आहात. तुम्ही जिवंत आहात याचा काय पुरावा? "

"मी जिवंत आहे ही काय अफवा आहे की काय? "

"असू शकेल. मला पुरावा पाहिजे. "

"माझ्या बायकोला घेऊन येऊ? "

"काय करणार त्यांना आणून? "

"तुमचा भारतीय संस्कृतीवर विश्वास आहे ना? "

"माझ्या कामात ढवळाढवळ होणार नसेल तर विश्वास आहे. "

"तुम्ही माझ्या बायकोच्या कपाळावरील कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र पाहा. माझी बायको विधवा झालेली नाही यापेक्षा माझ्या जिवंत असण्याचा अजून काय पुरावा असणार? "

"आश्चर्य आहे. "

"कशाचं? "

"शिकले सवरलेले असूनही काय वाट्टेल ते बडबडताय. "

"जिला भारतीय संस्कृती म्हणतात, तिच्या अनुसार कुंकू आणि मंगळसूत्र हे पती जिवंत असल्याचे प्रमाण मानले जाते. " मी एका न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले.

"तुम्ही पती आहात? " त्याने शंका उपस्थित केली.

"हो, अर्थात. " मी शंकासमाधान केले.

"पुरावा काय? " त्याने शंका उपस्थित केली.

"मी शपथ घ्यायला तयार आहे, की माझी एक आणि एकच बायको आहे. मी एक सभ्य माणूस आहे. "

"अच्छा. "

"हो तर. "

"तुमच्या विभागातल्या सब-इन्स्पेक्टरकडून प्रमाणपत्र आणा. "

"काय म्हणून? "

"की तुम्ही सभ्य आहात. "

"आमच्या एरियात येऊन कुणालाही विचारा. "

"दादा आहात त्या एरियाचे की भाई? "

"कुणीच नाही. "

"मग एरियाचा दम कुणाला देता? "

"मी दम नाही दिला हो. "

"मी इथे सरकारी काम करू, की तुमच्या एरियात चौकशी करायला जाऊ? "

"आता तुम्ही मला सभ्य माणूस मानत नसाल तर माझ्या एरियात जाऊनच विचारपूस करायला लागेल ना तुम्हांला. "

"मला पुरावा हवा. आणि तो या टेबलावर. "

"कशाचा? "

"की तुम्ही सभ्य आहात, आणि ज्या महिलेबद्दल तुम्ही बोलत आहात ती तुमचीच पत्नी आहे, आणि त्या महिलेच्या कुंकवा-मंगळसूत्राचा धनी तुम्हीच आहात, आणि तुम्ही जिवंत आहात. "

"माझं लग्न झालंय. "

"काय पुरावा? "

"आम्ही अग्नीला साक्षी ठेवून.... "

"ओ भाऊ, मी अग्नीला साक्षी ठेवून शेकड्यांनी सिग्रेटा पेटवल्यात. त्याने काय होतंय? " तो हसला.

"हे बघा, मला बिडी-सिग्रेट ओढायची सवय नाहीये, आणि उगाच वाद घालण्याचीपण. "

"चांगली गोष्ट आहे. इथे कुणाला वाद घालायचाय? "

"अहो, असं बघा, की मी मी आहे. जे पैसे मिळायचेत ते मला मिळायचेत. त्यासाठी अर्ज मी केला आहे. त्या अर्जावर मंजुरीचा शिक्कादेखिल उमटवला गेलाय. तर तुम्ही मला पैसे द्या. "

"तुम्ही पुरावा घेऊन या. "

"अहो, केवळ अडीचशे रुपयांच्या रकमेसाठी किती त्रास द्याल? "

"ते तर माझं कर्तव्यच आहे. "

"ही माणुसकी नव्हे. "

"माणुसकीच्या कसल्या गोष्टी करताय? हे कार्यालय आहे, सरकारी कार्यालय. किराण्याचं दुकान नव्हे. "

"मी म्हणतो, यापेक्षा ते बरे. "

"मग तिथेच जा ना. "

"तुम्ही माझे पैसे द्या, मग आनंदाने जाईन. "

"तुम्ही पुरावा घेऊन या, पैसे घेऊन जा. "

टिपकागदावरच्या शाईच्या ठिपक्यासारखी शांतता पसरत गेली. मग मी म्हटलं, "पंडितसाहेब, तुम्ही मला चांगलं ओळखता, आणि मी तुम्हांला चांगलं ओळखतो. "

"मी तुम्हांला ओळखत नाही. "

"मी तुम्हांला अनेक वेळेला चहा पाजला आहे, तुम्ही माझ्या घरीसुद्धा आला आहात. "

"प्यायलो असेन चहा. माझा तर जन्मच दुसर्यांकडून चहा पिण्यात गेला. पण मी तुम्हांला ओळखत नाही. "

"खोटं बोलताय तुम्ही. "

"ते तर माझं कर्तव्यच आहे. मी सरकारी नोकर आहे. "

"सरकारी नोकर असण्याखेरीजदेखील तुमची काही कर्तव्यं आहेत. "

"उदाहरणार्थ? "

"तुमचा मित्र असलेल्या एका व्यक्तीला तुम्ही ओळखता.  त्याच्या निवृत्तीवेतनाचे पैसे मिळायला मदत करणे तुमचे कर्तव्य आहे. मला पैशांची खूपच गरज आहे हे तुम्हांला माहीत आहे. "

"हे पाहा, या खुर्चीवर बसल्यावर मी जन्मदात्या बापालाही ओळख देत नाही. प्रश्न तत्त्वाचा आहे. "

"माहीत आहे मला" मी पराभव मान्य केला. मला कळले होते की हा वाद अनंत काळ चालू राहू शकतो. आधीही मी अशा वादांत सापडलो होतो, आणि पराभव माझाच झाला होता. हरकत नाही. प्रयत्न करणे माझे कर्तव्य होते, ते मी पार पाडले.

"आता असं सांगा, मला ओळखण्याचे, मी मी आहे हे मान्य करण्याचे किती घ्याल? " मी करुण स्वरांत विचारणा केली.

"पाच रुपये. पक्का रेट. "

"जास्ती होतात. "

"यापेक्षा कमी असतील तर मी त्याला ओळखत नाही. प्रश्न तत्त्वाचा आहे. "

"पहिल्यांदा तुम्ही दोन रुपयांत ओळखायचात. "

त्याने हसून माझ्याकडे पाहिले. मग माझ्या हातावर थोपटून तो भावुक स्वरांत म्हणाला, "दोन रुपयांत ओळखण्याचे दिवस गेले भाऊसाहेब. किती स्वस्ताई होती तेव्हा. सरकारी कार्यालयांत माणसाची ओळख एकदोन रुपयांत पटून जाई. पण आता ते दिवस गेले. तेव्हा तुम्हांला किती मिळायचे? तर पंचवीस-पन्नास असे काहीतरी.  पण किती प्रगती झालीय तुमची?  आता महिन्याला अडीचशे खेचताय. मग माझीपण प्रगती झालीय. मी पाच रुपयांखाली कुणालाही ओळखत नाही. माझी तर अशीच इच्छा आहे, की तुम्ही अजून प्रगती करा. तुमच्या खात्याला शेंडी लावा नि हजारांनी रुपये महिन्याला खेचा. म्हणजे मीसुद्धा तुम्हांला पाच ऐवजी पन्नास नि शंभर रुपयांना ओळखायला लागेन. "

लांब लांब लांबलेल्या चर्चेनंतर पसरावी तशी शांतता पसरली. मी खिशात हात घातला नि पाच रुपये काढले. त्याने हात पुढे केला नि ते घेतले.

"ठीक तर मग? मुलं-बाळं ठीक सगळी? " त्याने अगदी आपुलकीने विचारले.

"तुमची कृपा" मी म्हणालो.

त्याने त्याच्याजवळची सरकारी तिजोरी उघडली आणि त्यातून अडीचशे रुपये काढून तो मोजू लागला.