टाळीबाज

काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?

शब्द असतातच दिखाऊ, नाटकी
अर्थही झालेत टाळीबाज का?

बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी
वाचताना वाटते मग लाज का?

पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?

दूर व्हावे अन दिसावी संगती -
रे मना, तू ईश्वरी कोलाज का?

प्राण जोवर, कर्ज उरते तोवरी
कोठवर नुसतेच फेडू व्याज? का?

आग, पडझड, धूळ, भीती, आसवे...
आजही कानात ते आवाज का?