सेट डोसा (घावन)

  • तांदूळ २ वाट्या
  • उडदाची डाळ १ वाटी
  • जाड पोहे अर्धी वाटी
  • मेथीचे दाणे पाव टी स्पून
  • बटर (वितळविलेले)
  • मीठ
१५ मिनिटे
४ खादाडांना पुरेसे

तांदूळ, उडदाची डाळ, पोहे आणि मेथीचे दाणे आदल्या दिवशी दुपारी भिजत घालावे.

५-६ तासांनी (रात्री) मिक्सरमध्ये सर्व एकत्र करून, कमीतकमी पाणी वापरून गंधासारखे मऊ वाटावे. आणि उबदार जागी ठेवून द्यावे.

दुसर्‍या दिवशी सकाळी पीठ फुगून वर येईल. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून, पीठ फेटून घ्यावे. आवश्यकता असेल तर थोडे पाणी घालून पीठ मधासारखे (आणि इतपतच) ओतीव बनवावे.

एक नॉन-स्टीक (निर्लेप?) फ्राय पॅन (सपाट तळाचा) घेऊन मंद गॅसवर तापवावा. (तेल टाकू नये.) पॅन तापला की त्यावर एक डाव (आमटीच्या वाटी एवढा) पीठ  ओतावे. पॅन जरा हलवून पीठ गोल पसरवून घ्यावे. (जाडी साधारण अर्धा सेंटीमिटर) आणि झाकण ठेवून द्यावे. थोड्या वेळाने (साधारण एक मिनिट) झाकण काढावे. डोशाला भोके पडलेली दिसून येतील. डोसा वरून कोरडा झाला असेल तर त्यावर, पातळ केलेले बटर, चवीपुरते लावावे. डोशाची कडा लालसर झाली की डोसा उलटावा. उलटवून पाव मिनिट झाले की ताटलीत उलटवून (भोकांची बाजू वर येईल असा) काढावा.

शुभेच्छा...!

हे डोसे (घावन) चांगले फुगून स्पंज सारखे मऊ होतात. चटणी, सांबार बरोबर नाश्त्याला खाता येतात.

तसेच, जेवणात नॉनव्हेज बरोबर (किंवा व्हेज जेवणातही) पोळी/परोठ्या ऐवजी मस्त लागतात.  

हेच पीठ पॅन मध्ये पसरविले की त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरच्यांचे तुकडे, बारीक चॉप केलेले आले आणि कोथिंबीर टाकून, तळहात जरा ओला करून, किंचीत दाबून घ्यावे. नंतर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने जरा जास्त बटर टाकून उलटावे आणि अर्ध्या मिनिटा नंतर अलगद उलटवून ताटलीत (कांद्याची बाजू वर) काढावे.

हा झाला ओनिअन उत्तप्पा....

सांबार-चटणी बरोबर नाश्त्याला तयार.

शुभेच्छा...!

सौ. वर्षा सावरकर (मित्र-पत्नी)