मै टल्ली हो गयी...!!

नमस्कार मंडळी,

तुम्ही 'मै टल्ली हो गयी' हे नवे गाणे पाहिले आहे  का?
मद्यप्राशनाचा अभिनय करत मल्लिका ष्टेजवर नाचत आहे!   सोबत रणवीर शौरीही काही झटके मटके मारत आहे. अहो मल्लिका मंडळी मल्लिका!! बॉलीवूडमधील अनेक नटमोगऱ्यांना जिच्या शरीरसंपदेचा हेवा वाटतो ती साक्षात मल्लिका. एवढे असूनही मल्लिकाला आनंद कसला तर टल्ली झाल्याचा.

आहाहा! अहाहा!! आहाहा!!! मल्लिकाने गाण्यावर काय नृत्य केलं आहे मंडळी. गाण्याचे शब्दही किती अर्थवाही आहेत. मल्लिकासारखी एक दिग्गज अभिनेत्री, रणवीर सारखा विनोदी अभिनेता आणि प्रीतिश नंदी कम्युनिकेशन. काय सांगू मंडळी.

वास्तविक मल्लिकाला अनेक गोष्टींचा आनंद व्हायला हवा. तिचे भूतकाळात अनेक चित्रपट सुपरहिट झाले. साक्षात जॅकी चॅन बरोबर अभिनय(! ) करण्याची संधी तिला मिळाली. मात्र तिला आनंद कसला तर टल्ली होण्याचा!!

तक तक तकना वे
मख मख मख मखना वे

बघा मंडळी लाटानुप्रास अलंकाराचा कसा सुरेख उपयोग केला आहे या ओळींमध्ये! याच अलंकारातले ’चंदू के चाचा ने चंदू की चाची को’ हे एक गाणे तुम्हाला आठवते का मंडळी? तुम्हाला नाही आठवणार ते. त्यासाठी माझ्यासारखा अभ्यास हवा मंडळी. पण ’चंदू के चाचा ने’ मधील अनुप्रास आणि ’तक तक तकना वे’ मधील अनुप्रास यामध्ये सूक्ष्म फरक आहे. ’तक तक तक’ अशी पुनरावृत्ती झाल्यामुळे गाण्याला एक आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आमच्या कोकणातल्या वळणावळणाच्या रस्त्यांवर गाडी चालली की आमचे शरीर असे आंदोलित होते मंडळी.

पतियाळा पेग लगाके
तेरी गली विच आके
सब सूझबूझ होश गवाके
दीवानी मै पागल

ह्या ओळी बघा मंडळी. चित्तरंजन एका कवितेत म्हणतात ’तुझ्या शहरात मी आलो, खुळ्यागत भांडणे झाले. ’ तर इथे मल्लिका म्हणते 'तुझ्या गल्लीत मी आले आणि पतियाळा पेग लावला’.

मंडळी तुम्ही कधी पतियाळाला गेला आहात का? काय सांगू मंडळी पतियाळातल्या जुन्या दर्ग्याच्या मागे काय उत्तम मटण बिर्याणी मिळते. यम जर माझ्याकडे आला तर त्याच्या रेड्यावर डब्बलसीट बसून मी त्याला पहिल्यांदा पतियाळ्यातल्या जुन्या दर्ग्याच्या मागे मिळणारी बिर्याणी खायला घेऊन जाईन. घे लेको! खा म्हणेन. थांबा तुम्ही लगेच कल्पनाविलास करायला लागलात का? अहो मी हे यमाला म्हणतोय. त्याच्या रेड्यालाही पतियाळातल्या गोंडस म्हशी बघायला मिळतील. मात्र तुम्ही आपल्यासमोरचा वरणभात मुकाट्याने खा!  

आणि मंडळी इथे विच हा शब्द पाहिला का तुम्ही. अहो विच म्हणजे चेटकीण नाही काही. तुम्हाला आमची मल्लिका काय चेटकीण वाटते का? साक्षात अनुष्कानेही तिचा हेवा करावा अशी अप्सरा आहे ती. विच हा एक बोलीभाषेतला शब्द आहे मंडळी. सोकॉल्ड सभ्यतेची आणि संस्कृतीची झूल मिरवणारे लोक या शब्दाला नाक मुरडतील. पण ’विच’ ची मजा कशाविच आहे का मंडळी? अहो संस्कृती आणि सभ्यता ह्या गफ्फा आहेत हो सगळ्या गफ्फा!

आणि मंडळी तुम्ही शेवटची ओळ काळजीपूर्वक वाचली का? ’सब सूझबूझ होश गवाके’. अहो मंडळी तुकोबांनी तरी वेगळे असे काय म्हटले आहे?

भक्तिरसामध्ये डुंबणाऱ्या तुकोबांना जसे  "काय सांगो झाले काहीचिया बाही? पुढे चाली नाही आवडीने" असे वाटते. तसेच सोमरसामध्ये डुंबणाऱ्या मल्लिकाला ’सब सूझबूझ होश गवाके । दीवानी मै पागल" असे झाले आहे.

मै टल्ली हो गयी
मै टल्ली मै टल्ली मै टल्ली हो गयी

अहाहा! अहाहा!! या ओळी ऐकताना तुमच्या अंगावर शहारे आले नाहीत का मंडळी? या गाण्यावर मल्लिकाने कमरेला मारलेला झटका किती हळवा आहे मंडळी. अगदी जीव एवढासा होतो!

आणि काय नेमके शब्द वापरले आहेत इथे. ’मै टाईट हो गयी’ किंवा ’मै टुन्न हो गयी’ असे न म्हणता ’मै टल्ली हो गयी’ असे मल्लिका म्हणते मंडळी. अहो टल्ली ची नजाकत ’टाईट’ किंवा ’टुन्न’ मध्ये आहे का मंडळी? शिवाय मल्लिका आधीच इतकी टाईट आहे की तिला अजून टाईट व्हायची काही गरजच नाही. तिच्याबाबत मी जास्त काही बोलत नाही. अहो नाहीतर शरीराप्रमाणेच मनालाही कुबड आलेली मंडळी अश्लील अश्लील म्हणून ओरडायची!!

आणि हो! टल्ली हा शब्द ’तल्लीन’ या शब्दाशी किती जवळीक साधणारा आहे! अहो अनेक कट्ट्यांवरही लोक काय करतात. तर साहित्यप्रेमामध्ये, गप्पाटपांमध्ये तल्लीन होतात. हा आता काही करड्या जिभांचे लोक याला कंपूबाजी करून टल्ली होणे म्हणतील पण तो त्यांच्या ऱ्हस्वदृष्टीचा दोष आहे मंडळी. अहो  साहित्यसेवा म्हणजे तरी काय? शिवास रीगलचे दोन पेग लावून कळफलक बडवणे हीच तर खरी साहित्यसेवा आहे मंडळी. आणि आपल्या आवडत्या स्त्रीसोबत मावळत्या सूर्याच्या साक्षीने समुद्रकिनाऱ्यावर दोन पेगांचा आस्वाद घेत टल्ली होणे हेच खरे प्रेम!!  सोबत मोबाईलवर टल्ली गाणे जर चालू असेल तर दुधाच्या सायीत साखरंच!!

मंडळी, केवळ सोपे शब्द आणि मल्लिका यांच्या जोडीने या गाण्याला काय अप्रतिम उंची प्राप्त होते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. असो मंडळी, एखाद्या वरवर अगदी साध्या वाटणाऱ्या गाण्यातदेखील काय विलक्षण ताकद असू शकते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. हे गाणं ऐकलं (आणि विशेषत: पाहिलं) की मन बेचैन होऊन जातं. सोनेरी पारदर्शक रंगाच्या द्रवामध्ये बर्फ बुडावा तसं ते स्वप्नामध्ये बुडून जातं आणि आपण गुणगुणू लागतो.
मै टल्ली हो गयी मै टल्ली हो गयी!!

-- आजानुकर्ण पुणेकर