स्वप्नविश्वाचा विरह

कधी सकाळचा गजर वाजून सांगतो की, "उठा, आवरा, ऑफीसला जा... " आणि आपले मात्र ढिम्म हलायचे मन नसते. इत्तके मस्त स्वप्न पडत असते की ते सोडून ऑफीसला जायचे म्हणजे कैच्याकैच असे वाटावे. ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घ्यावी आणि असेच अनादीअनंत काळासाठी आपण आपल्या स्वप्नात रममाण व्हावे अशी अनावर इच्छा होते. फोन करायलाही स्वप्नातून बाहेर पडवत नाही. स्वप्नात मन रमवावे वाटत असतानाही का कोण जाणे मनाचे अर्धेअधिक लक्ष मात्र त्या मेल्या पुढेपुढे सरकणाऱ्या काट्यासोबत टिकटिक करत फिरत राहते. जी दोलायमानता शेवटी असह्य होऊन तिरीमिरीत उठून आवरून ऑफिसला जावेच लागते. अख्खा दिवस मग काही मनाजोगते म्हणून घडत नाही किंवा घडले तरी त्यात मजा अशी वाटत नाही.. ते स्वप्न.. ते स्वप्न पूर्ण पहायला मिळाले असते तर मस्त झाले असते असे वाटत राहते पण ते नक्की काय होते ते मात्र आठवत नाही त्यामुळे एक वेगळीच विरहभावना मनात उभी रहाते.

असे काही होते का तुम्हासोबतही? की मीच एकटी वेंधळी आहे असे चमत्कारीकसे काही आज अनुभवणारी? अशा परिस्थितीत नक्की काय केले तर ही विरहभावना टाळता येऊ शकते?