"रिऍलिटी'तील वास्तव स्वीकारा

एका बंगाली दूरचित्रवाहिनीवरील नृत्यस्पर्धेत शिंजीनी नामक स्पर्धक मुलीला अपयशामुळे नैराश्याचा झटका आला. या स्पर्धेतील एक प्रसंग तिच्या जिवावर बेतला. यासंबंधीच्या बातम्या दूरचित्रवाहिनी आणि दैनिकांत झळकल्या आणि अशाप्रकारच्या सर्वच कार्यक्रमांना, निर्मात्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. वस्तुतः ते चूक आहे. खरे तर या घटनेला शिंजीनीच्या कुटुंबीयांना जबाबदार ठरवायला हवे. आपल्या अपत्याला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण किती धीर देतो, यावर मुलांची मानसिकता घडत असते. केवळ अतोनात लाड करून त्यांना हवे ते, हवे तेव्हा देऊन हट्टी बनविणे किंवा अपयश काय आहे, हेच त्यांना कळू देणार नसाल, तर अशा मुलांच्या वाट्याला शिंजीनीसारखीच अवस्था येणार. पालकांनी अशा मुलांना "रिऍलिटी शो'मध्ये ढकलू नये.
कला कोणतीही असो, ती आत्मसात करण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. त्यासाठी कष्टाळू वृत्ती मुलांमध्ये असायला हवी. ती काही उपजत नसते. "आई-बाबां'ना मुलांमध्ये ती निर्माण करावी लागते. कष्टाळू वृत्ती एकदा अंगी आली, की अपयश पचविण्याचा कसदारपणा मुलांमध्ये आपोआप निर्माण होतो. "प्रथम अपयश आणि नंतर यश' हे साधे सूत्र जरी मुलांच्या गळी उतरविले, तरी पुष्कळ आहे. परंतु "माझा मुलागा इतरांपेक्षा खूप हुशार आहे. यश घेऊनच तो जन्माला आलाय; अपयश त्याला माहीतच नाही, ' हे सांगण्याची चढाओढ सध्याच्या "आई-बाबां'मध्ये दिसते. मुलांकडे तटस्थ वृत्तीने पाहून त्यांच्यातील गुण-दुर्गुण ओळखण्याची "हिम्मत' पालकांकडे नसेल तर मुलेही तकलादू मनोवृत्तीची बनतील.
कार्यक्रमांना दोष नको
कोलकत्याच्या शिंजीनीला "अक्यूट डिसएमिनेटेड एन्सेफेलो मियालिटीज' रोग जडल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. तिच्या कमकुवत मनोवस्थेमुळे तिला जास्त त्रास झाला. शिंजीनीच्या या अवस्थेबद्दल तिच्या कुटुंबीयांनी कुणालाही जबाबदार धरले नाही; पण प्रसारमाध्यमांनी मात्र "रिऍलिटी शो' आणि त्यातील परीक्षकांना धारेवर धरले. "रिऍलिटी शो'चा हेतू विविध क्षेत्रातील दडलेले "हिरे' शोधून काढण्याचा आहे. त्यात स्पर्धा असणारच! या शोद्वारे अमाप पैसा कमावला जातो हेही मान्य; पण नव्या कलाकारांना इतके सशक्त व्यासपीठ कुठे मिळू शकणार आहे? आताच्या दिग्गज कलाकारांना असे व्यासपीठ क्वचितच मिळाले असेल! हे वास्तव प्रत्येकानेच स्वीकारायला हवे. आणि स्पर्धा कुठे नसते? घरात सकाळी उठल्यानंतर दादू आधी अंघोळ करणार की ताई, बाबांनी खाऊ आणला की बच्चे कंपनी आधी मला, आधी मला करायला लागतात. इथपासून स्पर्धा सुरू होते. मुले वर्षभर शाळेत जातात. या काळात शाळेत होणाऱ्या स्पर्धेत ते भाग घेतात. शेवटी वार्षिक परीक्षा असते. (ही सुद्धा एक स्पर्धाच नाही का? ) स्पर्धा, परीक्षांमध्ये कमी मार्क्स मिळाले, अपयश आले तर ते स्वीकारले जाते. त्यावेळी शाळा, शिक्षणसंस्था, शिक्षकांना दोष दिला जातो का, याचाही प्रत्येकाने विचार करावा. मग "रिऍलिटी शो'ला दोष का? हे शो म्हणजे नवकलाकारांच्या आयुष्याला दिशा देणारे आहेत, असा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवायला हवा. कारण या शोमध्ये यशस्वी झालेल्या अनेकांना आपल्या जीवनाचा मार्ग सापडला आहे.