स्मारक

लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने :

दुबळे न ते, नि:शस्त्र ते होते जरी
तळहात होता, शीर होते त्यावरी

विझल्या चिता, विझले विचारांचे दिवे
उरल्यात पोथ्या आणि चर्पटपंजरी

वाटे हुतात्म्यांना किती कृतकृत्यसे
शिटतात जेव्हा पाखरे पुतळ्यांवरी

झटकू गुदस्ता सालभरची धूळ अन्
करुया जयंती फूल वाहून साजरी

पुतळे नको, स्मारक नको अन् घाटही
त्यांचे खरे स्मारक असावे अंतरी