... ही एकच आहे दिवली!

....................................
... ही एकच आहे दिवली!
....................................

मी काय कुणाला सांगू?
शब्दांना भरला लकवा....
एकाच ठिकाणी बसुनी
अर्थांना आला थकवा!

मी जखम काळजामधली
ही खोल कुणाला दावू?
सारेच चेहरे कोरे
मी बोल कुणाला लावू?

थिजलेल्या जगण्यासाठी
हा श्वास ताणवत नाही
आतून संपले सारे
बाहेर जाणवत नाही!

झुंजाया सज्जच होतो
भय नव्हते मज लाटांचे
सफरीवर आयुष्याच्या
आव्हान नव्य़ा वाटांचे!

साऱ्याच उसळण्याआधी
पण ओसरल्या का लाटा?
मी प्रवास करण्यापूर्वी
का गायब झाल्या वाटा?

सक्तीचे-आसक्तीचे
हे वेडे वादळवारे
होत्याचे नव्हते झाले
विरघळले सर्व किनारे!

मी दूर फेकला गेलो
बेटावर निर्जन कुठल्या...?
सावल्या मला घेराया
एकटेपणाच्या उठल्या!

सुटकेचा क्षण येईना
ही जन्मभराची शिक्षा
धुगधुगत्या आशेवरती
केवळ ही दीर्घ प्रतीक्षा !

मी कशा काय ओलांडू
या अंधाराच्या राशी?
ही एकच आहे दिवली
मिणमिणती माझ्यापाशी!

- प्रदीप कुलकर्णी

....................................
रचनाकाल ः ८ फेब्रुवारी  १९९८
....................................