भ्रष्टाचार एक शिष्टाचार.....!!!!

"आरे भाऊ, रुख्माबाईले बलाई ले, मना आते शेवटला टाईम जोळे यी जायेल शे. "

"तू गप्प, पडी राह्य, नाना आते येतच हुई डॉक्टरले लीसन." एवढं बोलून तात्या, डॉक्टर आणि नानाकाका अजून का आले नाहीत हे बघायला निघून गेले. माईआजीशिवाय तिच्या खाटेशेजारी मी, काकू आणि आई. "

"चंदू कोडे शे? शाळामा गया नही का तो आज? आथा ये रे भाऊ..... बठ मनाजोळे. खुब शिकजो, मोठा माणूस व्हयजो. आक्खा गावनी नाव काढाले पाह्यजे. "

थोड्याच वेळात, एक स्कूटर दाराशी येऊन उभी राहिली. नानाकाका, तात्या डॉक्टर घरात शिरताच माईआजी ओरडायला लागली.  "माले, जगणं नही, माले आते हाई दुखणं सईन व्हत नही. "

"असं कसं म्हणता आजी बाई, तुम्हाला अजून भरपूर जगायचंय, काहीच झालं नाही तुम्हाला". डॉक्टरांनी त्यांची तपासणी सुरू केली. माईआजीच्या डोक्यात गाठ होती म्हणे. माईआजी मला कितीतरी वेळा 'डोकं दुखतंय' म्हणून मला डोकं चेपायला लावायची.

"अरे देवा, माले जगणं नही, लिजाय माले जलदी. "

" असं कसं म्हणस माळी, तुले चंदू आवडस ना, मंग तेले मोठा व्हयेल देखणं नही का तुले? तेले मोठा डॉक्टर बनावसुत आपण. " नानाकाकांनी मला 'डॉक्टर' बनवण्याचं बोलून दाखवताच माझ्या मनात विचार सुरू झाले, त्या डॉक्टरांच्या गळ्यात लटकणाऱ्या यंत्राबद्दल. मी पण असाच स्कूटर वर फिरणार, माईआजीचे उपचार मीच करणार. मी माझ्याच स्वप्नविश्वात रमून गेलो.

त्यानंतर माईआजीला 'ममईला' नेलं, तिथे तिचं ऑपरेशन केलं, तिथून परतल्यानंतर माईआजीचं डोकं दुखणं बंद झालं आणि ती येणाऱ्या-जाणाऱ्याला 'तिची' डोक्यावरची 'शिवण' मोठ्या अभिमानाने दाखवू लागली. नंतर मी पुढे, १० वीत चांगले मार्क्स मिळाल्यानंतरही बाहेरगावी शिकायला जाऊ नाही शकलो, कारण होतं, 'कुळाचा एकुलता एक वंशदिवा'. तालुक्याच्या गावाला 'येऊन-जाऊन' शिकलो.

माझ्या १२ वीच्या वर्षात, पाऊस पडला नाही, पिकं आलीच नाहीत. माईआजीच्या ऑपरेशनसाठी गहाण ठेवलेलं, शेत ह्याही वर्षी सोडता आलं नाही.जशी पिकं कमी आलीत, तसेच मला मार्कही कमी मिळाले.मेडिकलच्या सगळ्या फेऱ्या झाल्या, पण मला 'एमबीबीएस' ची शासकीय महाविद्यालयाची सीट नाही मिळाली, १ महिना मी 'मुंबईतल्या' रुख्मा-आत्याच्या ओळखीच्या माणसाकडे राहिलो. खाजगी महाविद्यालयाची फी देणं मला परवडलं नसतं.निराश होऊन घरी जाण्याचं मन करेना. हताश स्थितीतच घरी आलो.

"चंदू बेटा काय झायं? " माई आजी. माझ्याने हुंदका आवरला गेला नाही, "माई तू देखे ना मी कित्ला अभ्यास करू, मी वावरना कामे भी करू, पण माले नही भेटनी ऍडमिशन आजी. "

" इत्लं काय मन वर लेस, तू परत अभ्यास कर, परत परीक्षा दे, मग तू व्हशिनच डॉक्टर."

"आरे खाजगी कॉलेजमान ली टाकता ऍडमिशन, मी देखी लेतू पैसास्न. " तात्या.

पण एका मोठ्या निश्चयाने मी सगळ्यांना सांगितलं, "मी शिकसू तर शासकीय कॉलेजमाच". मी परत परीक्षा देसु.

"आणि ह्या वरिसले तू वावरना कामे भी कराना नहित, आम्ही करी लेसुत. " नानाकाका.

दुसऱ्याच दिवसापासून अभ्यासाला सुरुवात केली. 'वावरात' फक्त दिवसाच जाऊ लागलो, आणि तेही अभ्यास करायलाच. मी आमच्या धाब्यावर एक झोपडी तयार केली, रात्री तिथेच अभ्यास करायचो. म्हणता, म्हणता, १ वर्ष गेलं, सीईटी दिली, खूप चांगले मार्क्स मिळाले, पहिल्याच फेरीत, मला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तात्या, नानाकाका, माईआजी, काकू आणि आई ह्यांचा आनंद गगनात मावेना. तात्यांनी सगळ्या गावात पेढे वाटले.

पुढे साडे चार वर्ष पुस्तकांमध्ये डोकं खुपसून होतो, 'इंटर्नशिपचं वर्ष तर कसं संपलं मला समजलंही नाही. तात्या म्हटले पुढे शिक, मोठा डॉक्टर हो, तुझा दवाखाना टाकू आपण 'जिल्ह्याच्या गावाला'.शासनाने मात्र पुढे शिकण्याच्या इच्छेवर पाणी फिरवलं. १ वर्षाची शासकीय नोकरीची सक्ती केली. ज्यांच्या घरी श्रीमंती होती, त्यांनी पैसे भरले आणि सक्ती माफ करून घेतली. आणी सुरू झाला एक प्रवास ,'शिष्टाचाराकडे'.

ह्या ४ महिन्यांच्या शासकीय नोकरीने मला सगळं काही शिकवलं. ह्या जगात नुसतं 'दररोजचं जगणं' ही किती कठिण झालं आहे, हे पाह्यलं. त्यातलेच काही प्रसंग.

प्रसंग १)

" कोणी पेशंट आहे का बाहेर? "

"नाही साहेब. " सुरेश.

"कुणी आलं तर पाठवा त्याला आत. "

सुरेश बाहेर जाऊन कुणाशी तरी बोलू लागला आणि त्यांचा संवाद मला ऐकू आला.

" डॉक्टरांची फी आणली आहे ना? डॉक्टर स्वतः फी मागत नाही, ते आमच्याकडे मागतात. बाहेर आल्यावर १०० रु. ची नोट टाका, दोघं सर्टिफिकेटखाली." सुरेश.

वृद्ध जोडपं आत आलं, त्यांना चालणंही कठिण झालं होत. त्यांच्या शरीरावरच्या सुरकुत्याच त्यांच्या वयाचा दाखला देत होते आणि ते दोघं सरकारी दवाखान्यात आले होते, ६५ वर्ष वयाचा दाखला घेण्यासाठी, एस टी मध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी.त्यांचं रेशनकार्ड बघून मी त्यांच्या सर्टिफिकेट्सवर सह्या केल्या आणि शिक्का घेण्यासाठी सर्टिफिकेट्स सुरेशकडे देण्यास सांगितलं.

" साहेब, सुरेशने १०० रु. मागितले आहेत, माझ्याकडे फक्त ५० रु. आहेत, हे तुम्ही ठेवून घ्या. " असं म्हणता म्हणता त्यांनी ५० रु. ची नोट माझ्या खिशात टाकली.मी ती नोट काढून त्यांना परत केली, त्यांचे पाय धरले.

" तुमच्या वयाची आजी आहे माझी, 'माझ्या शेतजमिनीने', ह्या धरित्रीने मला शिकवलं आहे, ते असे पैसे घेण्यासाठी नव्हे. "

ते निघून गेल्यानंतर मी अंतर्मुख झालो. ह्या बाबांचं वय त्यांनाही माहीत आहे की खरंच ६५ च्या वर आहे आणि तरीही त्यांची ५० रु. देण्याची तयारी आहे, कारण त्यांना ठाऊक आहे, की माझ्यासारखा 'नग' ह्या जगात आता मिळणं बंद झालं आहे.'पैसे हे लागणारच' अशी त्यांची मानसिकता झाली आहे, त्याला कारणीभूत आहे सुरेश आणि त्याच्यासारखे कित्येक 'सुरेश'.

प्रसंग २)

"काय डॉक्टर ? मनां पाय दुखणं बंदच व्हत नही, कितला गोया खाद्यात, २ महिना हुई ग्यात गोया खाई- खाई मना जीव कटाई गया. "

"कसा काय दुखणं बंद व्हत नही पाय? " कोणती गोयी लिंथी तुम्ही?"

प्रिस्क्रिप्शन पाहून मीच थक्क झालो, मी त्यांना दवाखान्यात उपलब्ध असलेली सगळ्यात महाग गोळी लिहून दिली होती. समस्या माझ्या लक्षात आली,

"मावशी तुम्ही एक काम करा, हिच गोळी खाजगी मेडिकल मधून विकत घ्या, सरकारी दवाखान्याची गोळी घेऊ नका, २च दिवसात तुमचा पाय दुखणं बंद होईल. "

तसंच झालं, मावशी येऊन मला भेटून गेल्या, पाय ठणठणीत होता. समस्या होती, ती दवाखान्याच्या गोळ्यांमध्ये, त्या गोळ्या आजारी पडल्या होत्या, त्यांनाच उपचारांची गरज होती, पण काय होतं माझ्या हातात?

प्रसंग ३)

रात्रीची वेळ होती, दवाखान्याच्या विश्रामगृहात मी झोपलो होतो. अचानक फोन वाजला. मी आणि अमित उठलो, पोस्ट-मॉर्टेम करायचं होतं. डोळे झोपेने जड झाले होते. तरी आम्ही सुरुवात केली. 'केस ऍक्सिडेंटची आहे', अशी माहिती सुरेशकडून मिळाली होती. तरी माझ्या लक्षात आलंच, त्या तरुणाच्या पाठीवर, धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. तसा अहवाल आम्ही तयार केला आणि स्पष्टपणे लिहिलं की हा ऍक्सिडेंट नसून कुणी तरी ह्या तरुणाला मारलं आहे. नंतर आम्ही झोपून गेलो.

सकाळी माझ्या मोबाईलवर एक स्थानिक फोन आला.

" डॉक्टर, तुम्ही कुठचे हो? "

" मी जळगावचा".

" मंगन कावून दुसऱ्या देशात येऊन शहाणपणा करता हायत. जे काय लागण, ते दिउन टाकू तुम्हाले.  लोकं म्हणता आहेत ना ऍक्सिडेंट झाला, मंगन कावून तुम्ही वाकडा 'अहवाल' तयार केला. "

"अहो, त्याला मारण्यात आलं आहे, तो ऍक्सिडेंट नाहीये."

" माहिती आहे हो माले ते. तुम्हाले काय लागतं ते बोला. "

मी फोन कट केला. त्यानंतरचा प्रत्येक क्षण ओरडून ओरडून सांगत होता, 'सभ्य राहून ह्या जगात जगणं अशक्य आहे', तुम्ही जरी सभ्य राहिलात तरी सुरेशसारखे लोकं तुम्हाला, "डॉक्टर आमच्याकडे पैसे मागतात" ह्या नावाखाली बदनाम करतील,मेला नसेल त्याला ही मारायला लावतील. गरीबांसाठी काहीच 'कंटेंट' नसलेल्या गोळ्या तुम्हाला द्यायला लावतील आणि पाय दुखणाऱ्या किती तरी मावशी तुम्हालाच दोष देतील, " डॉक्टरना काही गुणच लागत नही माय. "

मी लहान होतो, तेव्हा मी १ ली ते १० वी एक निबंध लिहायचो. दरवर्षी नेमाने लिहायचो, 'भ्रष्टाचार एक शिष्टाचार.... " चांगला २-३ पानं भरून भरून लिहायचो. मला चांगले मार्क्सही मिळायचो, तिथे चांगले मार्क्स मिळवून मी पासही झालो, पण जगाच्या ' रोजच्या जगण्याच्या' परीक्षेत दररोज नापास होतो आहे. लहानपणी सहज लिहून जायचो, 'शिष्टाचार' पण आता खरा अनुभव घेतल्यावर मात्र 'गलितगात्र' झालो, फोन कट करावा लागला.

"काय करू मी? " सुरेशला सांगू की नको बाबा, पैसे नको घेत जाऊ, सरकार जेवढा पगार देतं तेवढ्यातच पुरवत जा. मग सुरेशही म्हणतो, सरकार १-१ वर्ष पगार देत नाही, मुलं शिकायला लागली आहेत, भाड्याच्या खोलीत राहतो, घरी-म्हातारे आई-वडील आहेत, आणि एवढं सगळं, मी सरकारच्या १५०० रु. वर कसं भागवू?

सुरेशचा सीनियर डॉक्टर पैसे घेतो, कारण त्याला ह्या भागातून बदली करून घेऊन दुसरीकडे जायचं आहे, आणि बदली करून घेण्यासाठी त्याला १० लाख रु. द्यायचे आहेत. मी फक्त सीनियर डॉक्टरपर्यंतच विचारू शकतो, बाकीचे पैसे का घेतात कुणास ठाऊक?

घरी माझ्या शेतात गेलो.भरपूर विचार केला, सुट्टी घ्यायची,'राजीनामा' द्यायचा. पुढे अभ्यास करायचा. भरपूर मोठा डॉक्टर व्हायचं पण खिशात कुठल्याही सुरेशने टाकलेली एक दमडीसुद्धा ठेवायची नाही.

जय हिंद, जय भारत.