निवृती

छळले मी त्या सर्व कवींना स्मरतो आहे
शेवटचे मी आज विडंबन लिहितो आहे

वा व्वा टाळ्या खूप मिळाल्या मज रसिकांच्या
आत तरीपण एक कवी घुसमटतो आहे

कसा अडकलो प्रतिमेच्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम धडपडतो आहे

मित्रांनी ही सावध केले होते मजला
आठवणींनी त्या साऱ्या गलबलतो आहे

डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या ना पाहू शकतो
आरसाही बघण्यास मी घाबरतो आहे

शब्दांच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
विदूषकाचा भोग आज मज कळतो आहे

करा मोकळा प्रतिमेच्या पिंजऱ्यातून आता
हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे

साद घालते मला खुले आभाळ कधीचे
आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे