सती

भार माझा वाहणारा कोण आहे ?
नाव माझे लावणारा कोण आहे?

वर्षणारे मेघ सारे मोसमाचे
बारमाही सिंचणारा कोण आहे?

हो, तसे येतात मदतीला हजारो
दाम ना आकारणारा कोण आहे?

मी सती जाऊ कुणासाठी कशाला ?
संपता मी संपणारा कोण आहे?

धार शब्दांना नको आणूस इतकी
अर्थ त्यांचे लावणारा कोण आहे?

खेळण्या मातीत होते कैक आले
मृण्मयी, उद्धारणारा कोण आहे ?