आयएसआयचा विळखा

 बेंगळूरुमध्ये सात स्फोट झाले तेव्हा संसदेवरील हल्ला आणि 2005 मध्ये बेंगळूरुतील "आयआयएस्सी'वरील हल्ल्याची आठवण झाली. दुसऱ्याच दिवशी गुजरातमधील स्फोटांच्या बातम्या ऐकायला मिळतील, असे कुणालाच वाटले नसेल; परंतु विपरीत घडलेच. हे असेच घडत राहणार का?... संसदेवर हल्ला झाला त्याच वेळी देशाचा एकसंधपणा आणि सुरक्षेचा पाया किती भुसभुशीत झाला आहे, हे लोकांना समजले. देशाच्या गंडस्थळावरील या हल्ल्यानंतर दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारले जाईल, अशी अपेक्षा होती; ती फोल ठरली. कारण त्यानंतरही दहशतवाद्यांनी देशात अनेक ठिकाणी सहजपणे बॉंबस्फोट झाले- अजूनही होताहेत. यापैकी एकही हल्ला सुरक्षा यंत्रणेला रोखता आलेला नाही. किंबहुना राजधानी दिल्ली, मुंबईसारखी महानगरे, या शहरांतील महत्त्वाची ठिकाणे, सामान्य माणूस कुणीही सुरक्षित नाही. आम्ही कधीही, कोठेही स्फोट घडवू शकतो. हेच प्रत्येक हल्ल्यातून दहशतवाद्यांनी दाखवून दिले.
संसदेनंतर दहशतवाद्यांनी "आयआयएस्सी'वर हल्ला केला. यापूर्वीचे दहशतवादी हल्ले निरपराध लोकांचे बळी घेऊन प्रत्येकाच्या मनात भीतीचा गंड निर्माण करण्यासाठी आणि देशात अस्थिरता पसरवून अराजक माजविण्यासाठी करण्यात आले. पण कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही "आयआयएस्सी' या प्रतिष्ठित विज्ञान संस्थेवर हल्ला झाला. त्यात एका शास्त्रज्ञाचा बळी घेऊन भारताची बौद्धिक संपत्तीही सहजपणे लक्ष्य करू शकतो, हेच दहशतवाद्यांनी दाखवून दिले. या हल्ल्यामागे "लष्करे तैयबा' असल्याचे पुरावे मिळाले होते. याचाच अर्थ हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना "आयएसआय'ने मदत केली, हे उघड आहे. कारण "आयएसआय' आणि "लष्करे तैयबा' हातात हात घालून जगभरात दहशतवाद पसरवत आहेत. भारतात जेवढे दहशतवादी हल्ले झाले, त्यामागे असणाऱ्या प्रत्येक संघटनेचा संबंध "आयएसआय'शी आहे. "सिमी' आणि "उल्फा' या अतिरेकी संघटनाही त्याला अपवाद नाहीत. संपूर्ण देशालाच "आयएसआय'ने घेरलेय, हे यावरून स्पष्ट होते. "स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप'च्या अभ्यासाचा दाखला इथे देता येईल. या अभ्यासानुसार "आयएसआय'चे दहा हजारांहून अधिक कडवे हस्तक देशात आहेत. येथील फुटीरतावादी संघटनांमार्फत त्यांच्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत. फुटीरतावाद्यांना जाळ्यात ओढून आयएसआय आपला कार्यभाग कसा साधत आहे, याची माहिती अतिशय धक्कादायक आहे.

फुटीरवाद्यांचा वापर
केवळ दहशत माजविणे हा फुटीरतावाद्यांचा हेतू खचितच नाही. भारतापासून स्वतंत्र होणे, हे त्यांचे साध्य आहे. त्यासाठी दहशत निर्माण करण्याचा सोपा मार्ग त्यांनी अनुसरला आहे. स्वतंत्र होण्यासाठी फुटीरतावादी काहीही करण्यास तयार आहेत. त्याचाच फायदा "आयएसआय'ने घेतला असून, "उल्फा'मार्फत अनेक फुटीरतावादी संघटनांना एकत्र केले आहे. "उल्फा'सह ईशान्य भारतातील "एनडीएफबी', "एनएससीएन', "ऑल त्रिपुरा टायगर फोर्स', "नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा', "पीपल्स लिबरेशन आर्मी-मणिपूर', "कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन' (केएलओ) या संघटनांच्या अतिरेक्यांना आयएसआयने पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेशात अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण दिले आहे. फुटीरतावादी संघटना एका हेतूसाठी अतिरेकी कारवाया करीत असल्या, तरी सुरक्षा दलांबरोबर फार काळ लढा देण्यास त्या समर्थ नसतात. शस्त्रास्त्रांची उपलब्धता, आश्रयाची ठिकाणे, पैसा अशा अनेक समस्या या संघटनांसमोर असतात. हे सर्व ओळखूनच आयएसआय त्यांचा हवा तेव्हा वापर करीत आहे.

"उल्फा'च्या भूमिकेत बदल
बांगलादेशींना विरोध या एका मुद्द्यावर "उल्फा'ची निर्मिती झाली. काळ बदलला तशी भूमिका बदलली आणि भारतापासून स्वतंत्र अस्तित्व हे "उल्फा'चे उद्दिष्ट बनले. आयएसआयबरोबर झालेली सलगी उल्फाच्या भूमिकेतील बदलाचे कारण असू शकते. कारण पाकिस्तानला देशात दुहीची बीजे रुजवायचीच आहेत. पुढे कारगिल युद्धाच्या वेळी तर "उल्फा'ने पाकिस्तानलाच पाठिंबा जाहीर करून टाकला होता. आता "उल्फा' आयएसआयची मुख्य हस्तक संघटना आहे. फुटीरतावादी संघटनांमध्ये समन्वय, अतिरेक्यांना "हुजी'मार्फत (हरकत-उल-जिहाद-ए-इस्लामी) शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणे, भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, आर्थिक रसद पुरविणे आदी कामे "उल्फा' पाकिस्तानसाठी करीत आहे.

मुस्लिम अतिरेकी संघटनांचे जाळे
फुटीरतावादी संघटनांचे सामर्थ्य आणि आयुष्य किती आहे, याची पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळे आयएसआय पूर्णपणे "उल्फा'वर अवलंबून नाही. कारण, "उल्फा'च काय कोणतीही फुटीरतावादी संघटना कधीही उद्ध्वस्त होऊ शकते. त्याबरोबर आपणही उद्ध्वस्त होऊ, याची जाणीव असल्याने या संघटनांना समांतर मुस्लिम अतिरेकी संघटनांचे जाळे आयएसआयने ईशान्य भारतात उभारले आहे. अतिरेकी विचारांच्या मुस्लिमांना संघटित करणे, त्यांना मूलतत्त्ववादाचे धडे देऊन दहशतवादी कारवायांस प्रवृत्त करण्याचे काम मुस्लिम संघटनांद्वारे पाकिस्तान करीत आहे. मुस्लिम संघटना आणि फुटीरतावाद्यांमार्फत आसाम, नागालॅंड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यांत "आयएसआय'ने आपले इतके मूळ घट्ट केले आहे, की संपूर्ण देशात ही संघटना एका वेळी अराजक माजवू शकते. बेंगळूरू आणि गुजरातमध्ये झालेले स्फोट, हे त्याचेच निदर्शक आहे.

दुवा : www.santshali.blogspot.com