ऑगस्ट २००८

दुर्दम्य इच्छाशक्ती - बेडर

            मध्ये माझ्या बाबांचे, ते शाळेत असतानाचे मराठी पाठ्यक्रमिक पुस्तक मला मिळाले. त्यांनी ते जपून ठेवले होते. त्या वेळेस मी बराच निराश मनस्थितीत होतो. शिक्षण पूर्ण झालेले होते, पण पुढे काय करावे ते समजत नव्हते. कुणी मार्गदर्शन करणारा भेटत नव्हता. त्यात लोकांचे टोमणे ऐकून जीव विटून जायचा. अशा मनस्थितीत ते पुस्तक हाती पडले. अन् त्यातल्या बेडरच्या व्यक्तिचित्राने माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.   
            त्या पुस्तकात माझी बेडर शी जी ओळख झाली ती मी कधीच विसरणार नाही. जगात काही माणसे फार अचाट गोष्टी सहज करून जातात!! बेडर हा त्यापैकीच एक.
            सुप्रसिद्ध ब्रिटिश वैमानिक, डग्लस बेडर चा जन्म १९१० सालाचा. त्याचे वडील ब्रिटिश सैन्यात होते, ज्यांचा पहिल्या महायुद्धात मृत्यू झाला. त्या वेळेस बेडर फक्त १२ वर्षांचा होता. दुर्दम्य इच्छाशक्ती अन धाडस याचे दुसरे नाव म्हणजे बेडर. याच इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या २१व्या वर्षी "रॉयल एअर फोर्स" [RAF] मध्ये निवडला गेला, घरच्यांचा प्रखर विरोध असतानाही.
            पण बेडर खरोखरच अतिधाडसी होता. तो स्वभाव त्याला नडला. एका मित्राशी पैज लावून विमान कसरत करून दाखवताना अतिधाडसीपणा करून त्याने अपघात ओढवून घेतला. गंभीररीत्या जखमी अवस्थेत त्याला दवाखान्यात आणले गेले. एका आठवड्याच्या आत त्याचे दोन्ही पाय गुढघ्यापासून कापून टाकावे लागले. कुणासही वाटले नव्हते की तो जगेल. पण तो जगला.
            इकडे जग त्याच्या मृत्यूच्या गोष्टी करत होते अन् हा पठ्ठा पुन्हा विमान उडवण्याची स्वप्न रंगवत बसला होता. अर्थात स्वप्नपूर्तीसाठी त्याला आधी चालणे आवश्यक होते!! त्याला लोखंडाचे दोन खोटे पाय लावण्यात आले. काही दिवसातच त्याने आधाराची काठी वापरणे बंद करून टाकले. "माझा मार्ग मी स्वतःच बनवणार आहे" असे तो म्हणे. कसेबसे चालणे जमत होते. तर पुढचे ध्येय त्याने ठरवले की पूर्वी खेळायचो तसा गोल्फ खेळता यायला हवा. आता ज्याला चालणेही शक्य नाही त्याच्याकडून गोल्फ खेळू शकण्याची अपेक्षा कोणी करेल काय? गोल्फ खेळताना पहिला शॉट मारण्याच्या वेळेस त्याला तोल सावरता आला नाही, तो पडला. एक-दोनदा नाही, ४० वेळा पडला. पण ४१ व्यांदा त्याला शॉट मारता येऊ लागला, न पडता! लवकरच त्याने कार चालवणेही सुरू केले!! अर्थात त्याचे लोखंडी पाय सामावून घेण्यासाठी कार मध्ये खास जागा करावी लागली. बेडर जेव्हा सुटाबुटात चालत येई तेव्हा विश्वास बसत नसे की त्याचे दोन्ही पाय खोटे आहेत!
            तब्बल ८ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर, १९३९ साली, एकट्याने विमान चालवायला मिळाल्यावर त्याला काय वाटले असेल? शब्दांत ते सांगणे कठीण आहे. त्याला पुन्हा "रॉयल एअर फोर्स" [RAF] मध्ये प्रवेश मिळाला. त्या वेळेस ब्रिटिश सैन्याला वैमानिकांचा तुटवडा होता. प्रशिक्षित वैमानिक असतील तर त्यांना हवेच होते. पण कुणी पांगळा वैमानिकसुद्धा घ्यायला लागेल अशी कल्पना पण त्यांनी केलेली नसणार! दुसऱ्या महायुद्धात त्याने असामान्य कामगिरी बजावली. शत्रूची २३ विमाने त्याने एकट्याने पडली. प्रसिद्ध बिग विंग फॉर्मेशन तयार करण्यात त्याने मुख्य भूमिका बजावली.
            १९४१ च्या उन्हाळ्यात सगळ्यात सफल ब्रिटिश वैमानिकांत बेडर पाचव्या क्रमांकावर होता. ४ स्क्वॉड्रन्सचे नेतृत्व या पांगळ्या वैमानिकाकडे असे. Distinguished Flying Cross (DFC) आणि Distinguished Service Order (DSO) असे दोन पुरस्कार त्याला मिळालेले होते. शेवटी ऑगस्ट १९४१ मध्ये त्याच्या विमानाला अपघात झाला अन् तो नाझींच्या तावडीत सापडला. पण त्याची कीर्ती तोवर सर्वदूर पसरली होती. नाझींनी त्याला जीवे मारले नाही, अटकेत ठेवले. त्या अपघाताबद्दल बेडर म्हणतो, "मी किती भाग्यवान, माझा लोखंडी पाय तेवढा मोडला. खरा पाय असता तर मला किती भयंकर जखमा झाल्या असत्या!! ". त्याने पळून जायचे प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. पुढे युद्ध संपल्यावर त्याची सुटका झाली. युद्धानंतरच्या विक्टरी फ्लाय पास्ट चे, ३०० विमानांच्या ताफ्याचे, नेतृत्व त्याच्या कडे होते. निवृत्तीनंतर त्याने अपंगांसाठीचे कार्य सुरू ठेवले. पुढे उत्तरायुष्यात त्याला ब्रिटिश नाईटहूड ने नावाजण्यात आले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
            असा हा बेडर. मला तर त्याचा खूप आधार वाटतो. कितीही उदास मनस्थिती असू देत, त्यातून बाहेर काढण्याचे काम तो अगदी इमाने इतबारे करत असतो!! कितीतरी गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. नाही?


मुमुक्षू

Post to Feedबेडर..
बेडर हा शब्द
धनचिन्हांकित विचारसरणी
प्रेरणादायक
आभार

Typing help hide