स्वप्न उन्हाचे...!

............................................
स्वप्न उन्हाचे...!
............................................

श्रावणातल्या
उन्हास
आली
पेंग
जराशी...
बघता
बघता
त्याचे
पिवळेपण
अंधुक
झाले...!

त्याच
क्षणी
वर दूर,
दूर वर
मेघ
दाटले...
डुलकी
घेतें
ऊन्ह
सावळ्या
सरीत
न्हाले...!!

त्या
पेंगेतच
उन्हास
क्षणभर
अगदी
क्षणभर
स्वप्न
ओलसर
मोहक
पडले...!

हिरव्या
हिरव्या
क्षितिजावरती
रूप
घेउनी
रंगांचे
प्रसन्नतेने
ते
उलगडले...!!


- प्रदीप कुलकर्णी

............................................
रचनाकाल ः २७ जून २००५
............................................