दादा कोंडके

                                                                         

दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.....
व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली.
द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके/वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली.......
पिटातल्या प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काही देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात - दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत 'गंगू'च्या तंगड्यांची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा 'मायबाप' होता.  

८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या "कृष्णा" ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्य, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.

दादांचे बालपण नायगावच्या - मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकर पणे घालवण्याचा निश्चय केला.......
नायगाव परिसरात - "बॅंडवाले दादा" ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.   

कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग 'सेवा दलात' प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वत:ची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या "खंकरपूरचा राजा" ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावीत केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या "विच्छा माझी पुरी करा" ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले...... १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले 'विच्छा.... ' चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले.
दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफल मधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.  

१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या "सोंगाड्या -(१९७१)" ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. 'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटा नंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाइन लावून दिली. स्वत:च्या "कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रकाशित केला.
१९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशीत केले. १९८१ साली 'गनिमी कावा' त्यांनी दुसऱ्या (बहुदा भालजींच्याच) बॅनर खाली केला.  

एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे..... कामाक्षी प्रॉडक्शन ची टीम वर्षो न वर्षे कायम राहिली..... त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर - पार्श्वगायना साठी तर 'बाळ मोहिते' प्रमुख दिग्दर्शन सहाय्यक..... कुठल्याही 'क्विझ' कार्यक्रमात हा प्रश्न विचारल्यास बेधडक उत्तरे हीच द्यावीत......
लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले.
हिंदीतून - तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६) व आगे की सोच (१९८९) हे चित्रपट त्यांनी प्रकाशीत केले.   
१९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धरतीवर "चंदू जमादार" हा गुजराती चित्रपट प्रकाशीत केला......

सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा 'टर्निंग पॉंईंट' ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या 'आये' ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरुपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या 'नाम्या' ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेउन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच 'नाम्या' सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे.... चाहत्यांकडून स्वत:च्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत...... कुणी त्यांना आपल्या मुला बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्घाटनाचे.... पण 'तांबडी माती' हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वत:चे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते! त्यांच्या सारखा खरोखरचा 'डाउन टू अर्थ' नट मिळणे असंभव !  

वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी असाच विधीसंकेत असावा..... कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या (सोंगाड्याच्या) आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा 'तीन देवीयां' हा चित्रपट प्रकाशीत करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले...... मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर "राडा" घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच 'सोंगाड्या' प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले...... पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली.

दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती..... सेन्सॉर च्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी; त्यांची शिवसेनेशी बांधीलकी; त्यांचे प्रणय; त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्वींनी नावाची त्यांना कन्या होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणून वावरले.

मार्च १४, १९९८ रोजी पहाटे ३. ३० ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रुषा नर्सिंग होम मध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते पण शेवटी त्यांचे सुश्रुषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लिलाबाई मोरे हयात होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.......
मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापीत केली होती / करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ( त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.  

दादा कोंडकेंची जन्मतिथी ८ ऑगस्ट ला आहे.....
मराठी चित्रपट सृष्टीवर दोन दशके आधिपत्य गाजवलेल्या व निर्विवादपणे मऱ्हाटी जनतेच्या गळ्यातला ताईत बनलेल्या ह्या नटवर्याची काही गाणी यू ट्यूब वर बघताना त्यांच्या चारित्र्याचा मागोवा घेण्याचा विचार डोक्यात आला..... विकिपीडिया चा संदर्भ घेत त्यांचे जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला व थोडे फार वाचल्यावर जाणवले की ह्या मऱ्हाटमोळ्या माणसावर मायबोलीत काहीच लिहिलेले नाही..... म्हणून हा लेख प्रपंच!

संदर्भ: विकिपीडिया व त्यातले दुवे-