अर्थाचा विनोदी अनर्थ- भाग शेवटचा- (म्यांव, मियांव आणि मिहीयांव)

थोड्याच वेळात : आमच्या टिव्हीचा एक अभिनव एक्सक्लुजीव्ह खुलासा.

सनसनीखेज खुलासा -म्यांव, मियांव आणि मिहीयांव

एक मांजर करणार खुलासा.....

एक्सक्लुजीव्ह खुलासा.....

मांजर बोलणार.....

करोडो लोक ऐकणार...... पाहात राहा....

ब्रेकिंग न्यूज : "आज आपल्या स्टुडिओत आले आहेत, मांजर स्पेशालिस्ट म्यांजेश म्यांउकर. आणि आमच्या मार्जारी म्यांव या प्रतिनिधीने शेवटी त्या मांजरीचा ठावठीकाणा शोधला आहे, व तीला पकडून स्टुडिओत आणले आहे. इकडे कुकराबईला अटक झाली असून तीने यापुढे सुनेशी असे न वागण्याचे वचन सराटातईला दिले आहे. शेअर बाजार आता त्यामुळे वधारला आहे. आणि या नाट्यावर महेश मांजरेकर आता चित्रपट काढणार आहेत. आणि त्यात मांजरीची भूमिका करणार आहे, मल्लीका मांजरावत.तर आता आपण वळूया मार्जारीकडे. .नमस्कार मार्जारी! "

मार्जारी : "नमस्कार! "

निवेदीका उडी मारून मार्जारी जवळ येते व तीला प्रणाम करते.

निवेदीका : " तर मार्जारी, आधी आम्हाला सांग, कसे काय पकडलेस या मांजरीला?"

मार्जारी : "ती अशी पुढे आणि मी मागे, धावले, खुप धावले. जाळे टाकले. आणि पकडले. आली कचाट्यात."

निवेदीका : "धन्यवाद मार्जारी. आता आपण आपल्या स्टुडिओत बोलावले आहे, मांजर स्पेशालिस्ट म्यांजेश म्यांउकर यांना."

म्यांजेश : "नमस्कार. मी मांजर-दुभाषा."

निवेदीका : "आपण या मांजरीने केलेला खुलासा बघणारच आहोत. पण, त्या आधी आपण परिचय करून घेणार, मांजर स्पेशालिस्ट म्यांजेश म्यांउकर यांचा. तुमच्या लहानपणापासूनचा प्रवास सांगा. कसे तुम्ही या क्षेत्रात आलात?"

म्यांजेश : "माझे वडिल श्री. मांजरोबा मांजरसाळे हे कुक्कुट पालन करायचे. एकदा एका मांजरीने कोंबड्यांना घाबरवायला सुरुवात केली. त्यामुळे बऱ्याच कोंबड्या मेल्या आणि तेव्हा पासून माझे वडील मांजरींना व बोक्यांना वश करू लागलेत. मलाही सवय लागली. ते मांजरांना पाळू लागलेत व त्यांनावर विशिष्ट प्रोग्रामिंग करून इतरांच्या घरात ते सोडत असत. त्यामुळे त्या मांजरी घरी आल्यावर इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत. आणि वडिलांना त्यांची भाषा समजायला लागली आणि मलाही. वडिल गेले पण मी तेच करतो. मांजर-दुभाष्याचे काम!"

निवेदीका : "अक्षरशः भारावून गेले मी हे सर्व ऐकून. आता आपण जाणून घेवूया काय सांगतेय ही मांजर"

मांजर उडी मारून निवेदीकेच्या मांडीवर बसली व म्हणाली: " मेयांव, मिमी मयांव. मिमी मयांव. मे मयांव. म्योयांव.म्यांव! "

म्यांजेश : " ती म्हणतेय की त्या घरातील कुकराबाई नेहेमी त्या सुनेला त्रास द्यायची. तीच्या मुलाला सुद्धा सुनेजवळ जावू द्यायची नाही. "

मांजर : " मे मे म्या म्या म्यू म्यू मोएअऍव मियांव"

म्यांजेश : " ती म्हणतेय की तुमच्या या चॅनेलमुळेच कुकराबाईच्या सुनेला न्याय मिळाला. "

मांजर : " टॉमं जेऱ्यांव टॉम जेऱ्यांव... मी ख्यांव... म्यां..... व. म्याह्याव मिहियांव"

म्यांजेश : " ती म्हणतेय की त्या दिवशीचा उंदिर तीने खावून टाकला आणि तीचा आवडीचा प्रोग्राम आहे टॉम ऍण्ड जेरी "

निवेदीका : " चला तर. आताच आपण बघितलात- सनसनीखेज खुलासा -म्यांव, मियांव आणि मिहीयांव."

आणखी एक खुलासा : या मांजरीला आता अनेक जाहिरातींच्या ऑफर्स आल्यात. व आनिमल प्लॅनेटवर ती निवेदिका असणार आहे.

(समाप्त)

---निमिष सोनार, पुणे