कवितेशिवाय कविता...!


................................
कवितेशिवाय कविता...!
................................

विसरायला हवा मी माझ्यातला कवी!
आता नको सुचाया कविता मला नवी!

मी तीच तीच दुःखे सांगायची किती?
वेशीस लक्तरे ही टांगायची किती?
या त्याच त्यापणाला कोठून टवटवी?

कवितेशिवाय जगणे हे कोरडे जरी...!
कवितेविना न काही माझ्याकडे जरी...!
मी वाढवू कशाला ही जून पालवी?

शब्दांपलीकडे मी जाईन का कधी?
शब्दांशिवाय गाणे गाईन का कधी?
कवितेशिवाय कविता लाभायला हवी!

- प्रदीप कुलकर्णी

................................
रचनाकाल ः
१ जानेवारी १९९८
................................