लोणी

  • दूध (प्राधान्य गोकूळ दूधाला)
  • चांगल्या प्रतीचे दही
२० मिनिटे
ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात

आपण रोजच्या रोज दूध घेतो. साधारण १ लिटर दूधाची पिशवी बहुतेक जण रोज घेतात. पहिल्याप्रथम मंद आचेवर दूध तापवून घ्या. ते गार झाले की शीतकपाटात  ठेवा. दुपारी ४ च्या सुमारास ते दूध  शीतकपाटामधून  बाहेर काढून त्यावर जमा झालेली दाट व जाड साय एका भांड्यात काढून ते भांडे परत शीतकपाटात ठेवा. याच पद्धतीने चार दिवसाची साय जमा करा. ४ दिवसानंतर ती जमा झालेली साय एका मोठ्या भांड्यात काढून त्यात दूध तापवून घाला. दूधाचे प्रमाण जमा झालेल्या सायीच्या दूप्पट असायला हवे. मग एका डावेने ढवळून घ्या.

नेहमी दही लावताना आपल्या हाताचे बोट दुधामध्ये घालून ते बोटाला सहन होण्याइतपत झाले की मग त्याला विरजण लावा म्हणजेच त्यामध्ये चांगल्या प्रतीचे दही घाला. दह्याचे प्रमाणही ऋतुमानाप्रमाणे ठरवावे. जसे की हिवाळ्यात दही जास्त घालायला लागते तितके ते उन्हाळ्यात कमी प्रमाणात पुरते. साय व दूध या मिश्रणात पुरेसे दही घालून परत एकदा डावेने/चमच्याने बरेच वेळा ढवळावे.

दाट सायीचे दही तयार झाले की एका भांड्यामध्ये किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये ताक घुसळायला घ्यावे. अजिबात पाणी न घालता  पूर्ण दह्याच्या खालपर्यंत घुसळायची रवी घालून ताक घुसळायला घ्यावे. ५ ते १० मिनिटात लोण्याचा गोळा रवीभोवती जमा होतो आणि खाली नितळ ताक तयार होते.  आता एका भांड्यात पाणी घेऊन पहिल्याप्रथम रवीभोवती जमा झालेले लोणी सोडवून घ्या. रवी पाण्याने धुवून बाजूला ठेवा. नंतर पातेल्याच्या कडेकडेने सर्व लोणी सोडवून घ्या व लोण्याचा गोळा पाणी असलेल्या भांड्यात ठेवा. आता हे लोणी वर खाली करून पाण्याने धुवा भांड्यातच. त्यातले पाणी ताकात घाला. असे २-४ वेळा करा. म्हणजे लोण्यातील राहिलेला ताकाचा अंश पूर्णपणे निघून जाईल. मग हे लोणी दुसऱ्या एका भांड्यात घालून त्यात लोण्याच्या वर पाणी राहील इतके पाणी घालून ते शीतकपाटात ठेवा.

अश्याच प्रकारे परत ४ दिवसांची साय जमा करून परत एकदा याच पद्धतीने दही लावून त्याचे ताक बनवा व लोणी काढून ठेवा. पहिले साठवलेले लोणी आहे त्यातले  पाणी काढून परत त्यात पाणी घालून लोणी वर खाली करून पाण्याने धुवा. व ते पाणी टाकून द्या. मग त्यावर दुसरे काढलेले लोणी ठेवून परत त्या लोण्याच्या वर पाणी येईपर्यंत पाणी घालून परत शीतकपाटामध्ये ठेवा. असे ८ दिवसाचे लोणी कढवून त्याचे साजूक तूप बनवा.  साजूक तुपाची कृती मनोगतावर दिलेली आहे.

घरचे लोणी बनवले की घरचे सायीचे दही, साधे दही, ताक, लोणी व साजूक तूपही खायला मिळते. चांगल्या प्रतीचे व भरपूर प्रमाणात दूध दुभते तयार होते. पूर्वी हे सर्व जिन्नस ठेवायला एक लाकडी कपाट आणि त्याला वरून जाळी असे. यालाच दुभत्याचे कपाट म्हणायचे.

घरात लहान मूल असेल आणि त्याच्या तळहातावर असे ताजे लोणी ठेवले तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो!! घरात कोणतेही शुभकार्य असेल तर जेवणावळीत घरचे तूप भरपूर प्रमाणात वाढता येते.

सौ आई