हा बाजार बंद करा

आज संध्याकाळपासून सातत्याने अनेक वाहिन्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिलेला तिथल्या 'कार्यकर्त्या'ने अक्षरश: ढकलून, अवमानित करून हाकलले त्याचे प्रक्षेपण करीत आहेत. संपर्क साधला असता उत्सवाचे प्रमुख उपलब्ध नाहीत वा कॅमेऱ्यासमोर येत नाहीत असे काही वाहिन्या सांगत आहेत तर एका वाहिनीवर लालबाग राजा चे श्री. सुनिल जोशी यांनी 'ती महिला चपला घालून व विशेष महत्वाच्या व्यक्तिंकरीता असलेल्या रांगेत जात होती व तिने सांगून न ऐकल्यामुळे नाइलाजाने कार्यकर्त्यांना असे वागावे लागले' अशी मल्लिनाथी केली. हे कुणाला पटलेले दिसत नव्हते. अनेक भक्तांनी वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना इथले कार्यकर्ते फार अरेरावीने वागत असल्याची व काहींनी तर मारहाण देखिल करत असल्याची माहिती दिली. मात्र याच देवाच्या दर्शनाला आलेले मुख्यमंत्री, कलाकार वगैरेंची मात्र उत्तम बडदास्त ठेवली जात असल्याचे दाखविले. काय खरे काय खोटे ते बाप्पाच जाणे.

मात्र या प्रकाराने एकुणच देवा धर्माच्या बाजारीकरणचा उबग आला. तिरुपती बालाजी, शिर्डीचे श्री साईबाबा, दादरचा श्री सिद्धिविनायक... एक देव यातून सुटला नाही. सर्वसामान्य भक्त रांगेत तिष्ठत तासनतास उभे असताना केवळ पैसा, प्रसिद्धी वा अधिकाराच्या जोरावर अग्रक्रमाने दर्शन घेणे व ते घेतले जाऊ देणे हे खरोखरच किळसवाणे आहे. अशा देव-धर्म दलालांमुळे लोकांचा व एकंदरीतच समाजाचा देवावरील विश्वास उडाला तर त्यात नवल ते काय? पैसे घऊन कागद पटकन हलविणारा अंमलदार आणि पैसे देऊन वा अधिकार/ नाव-लौकिक वापरून देवाचे दर्शन यात सर्वसामान्य माणसाला साधर्म्य भासल्यास गैर ते काय? माझ्या अंगी तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घेण्याईतका भक्तिभाव नसला तरी भक्त रांगेत उभे असताना पुढे जाऊन वेगळ्या मार्गाने दर्शन घेण्याईतका मुर्दाडपणाही नाही.

एकिकडे लोकशाहीच्या गप्पा माराच्या आणि दुसरीकडे राजेशाही वा सरंजामशाही भोग भोगायचे! लोकशाहीत राष्ट्राला आणि देवळातल्या देवाला सगळे समान! मग असा भेदभाव का? लाखो वारकरी शेकडो मैल तंगडतोड करून पांडुरंगाच्या दर्शनाला आसुसलेले असताना मंत्री संत्री राजरोस त्यांना बाजुला सारून हक्काने मनसोक्त पूजा करणार! हा कुठला न्याय?

जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा.

मला लहानपणी वाचलेली 'खुलभर दुधाची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प राजाने केला व सक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणून घालायचा हुकुम सोडला. साऱ्या गावाने सगळे दूध ओतले तरी गाभारा भरेना. अखेर एक म्हातारी आली. तिने राजाचा हुकुम बाजुला सारून आपल्या घरच्या वासराना, लेकराना दूध पिऊ दिले आणि उरलेले खुलभर दूध ती देवळात घेऊन आली. तिने आपला गडू देवावर ओतताच गाभारा ओसंडून वाहू लागला.