मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव

भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे, टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक, सुंदर गणेशमूर्ती विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो. मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच. पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले. कस्टम अधिकाऱ्याने आमच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. उलट टॅ़क्सी मिळवून दिली. गणेशकॄपा! त्यामुळे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतीय शुभ वेळेनुसार सकाळी १०. ३० वाजता आम्ही श्रीगणरायांची प्राणप्रतिष्ठा यथाविधि शास्रोक्तरित्या केली. पूजेचे पौरोहित्य मी व यजमानत्व मुलाने केले. दुपारी एकवीस उकडीच्या मोदकांचा नैवेद्यही दाखविला.

आमच्या कँपसमध्ये फक्त आमच्याकडेच गणपती असल्यामुळे खूप लोक दर्शनाला येऊन गेले. येथे गणपतिबद्दल लोकंमध्ये कमालीचे औत्सुक्य आहे. आमच्या टॅक्सीचालकापासून सर्वांनी दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी आम्हा 'सेमिलिंग सिस्टर्स"क्लबच्या महिलांचे भजन होते. त्यात सर्व देशवासी भगिनींनी आनंदाने भाग घेतला. प्रत्येकीने आपापल्या धर्मानुसार व प्रथेनुसार भजन/प्रार्थना म्हटल्या. त्यात इराणी, ब्रिटीश, मुस्लिम व विविध प्रांतीय भारतीय महिला होत्या. त्यांनी ह्या "एलिफंट हेडेड गॉड"विषयी अनेक प्रश्न विचारले. मी यथामति उत्तरे दिली.

शनिवारी सकाळी दरवर्षीप्रमाणे श्रीसत्यनारायणाची पूजा केली. मी पूजा सांगितली व माझ्या सूनेने ती केली.

संध्याकाळी गौरी बसविल्या.

रविवारी गौरीपूजन व भोजनाचा कार्यक्रम झाला. गौरीच्या सवाष्णी म्हणून विविध प्रांतीय महिलांना आमंत्रित केले होते. पुरणपोळीचा फक्कड बेत जमला होता. त्या महिलाही अत्यंत खुश झाल्या. सोमवार दि. ८रोजी सायंकाळी श्रीगणपती व गौरींचे विसर्जन केले. पहिल्या दिवशी सोडलेल्या संकल्पानुसार दररोज अथर्वशीर्षाची १०० आवर्तने करून अनंत चतुर्दशीपर्यंत सहस्त्रावर्तने एकट्याने पूर्ण करणार आहे.
सर्व पूजासाहित्य येथिल एका इंडियन स्टोअरमध्ये मिळाले.

योगायोगाने गणपतिचे आवडते जास्वंदीचे फूल हे येथिल राष्ट्रीय फूल मानले जात असल्यामुळे येथे जास्वंदीच्या बागाच बागा आहेत.
आमच्याकडून आपली सेवा यथासांग करवून घेणाऱ्या श्रीगणरायांच्या कृपेनेच हा सुयोग आमच्या जीवनात प्राप्त झाला.

गणपती बाप्पा मोरया! पुढल्या वर्षी लवकर या!!!
हा सण परदेशात भारतीय पद्धतीने साजरा करताना मला व माझ्या कुटुंबियांना जो अविस्मरणीय आनंद झाला तो मनोगतच्या चोखंदळ आणि जिज्ञासू वाचकांमध्ये वाटावा ह्या आणि फक्त ह्याच हेतूने हा माहितीवजा लेख लिहिण्याचा हा माझा एक प्रयत्न!!