"म्हणी' मॅटर्स!

बोलण्यात अनेकदा म्हणींचा वापर आपण करत असतो. लिहितानाही करतो. त्यांचा अर्थ काही वेळा आपल्याला पूर्णपणे कळलेला असतो, काही वेळा फक्त म्हण माहीत असते. म्हण ही अतिशय कमी आणि चपखल शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. म्हण ही त्या-त्या भागाचं वैशिष्ट्यही असते. आमच्या कोकणात अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत. हा धागा सुरू करतोय, आपल्याला माहिती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आणि त्यांचा अर्थ सागण्यासाठी.
उदा. 1. "वाघ पडला बावी, केल्डं गां* दावी' अशी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. "बाव' म्हणजे विहीर. केल्डं म्हणजे लाल तोंडाचं माकड. ते कोकणात हमखास पाहायला मिळतं. वाघ विहिरीत पडला, की माकड सुद्धा त्याला वाकुल्या दाखवतं, असा त्याचा अर्थ. किती समर्पक आहे ना म्हण? आपण अगदी रोजच्या व्यवहारात, समाजात हीच विदारक स्थिती पाहत असतो.
2. "ज्यासाठी लुगडं, ते सगळं उघडं' अशी पण एक म्हण आहे. म्हणजे जो उद्देश आहे, तो साध्य न होता बाकीच फापटपसारा मांडला जाणे.
3. "दिवस गेला रेटारेटी नि चांदण्यात कापूस काती' ही म्हणही अनेकदा ऐकलेली. म्हणजे दिवस फुकट गेला आणि कापूस कातायला रात्रीचा मुहूर्त लागला. अर्थात, जेव्हा हातात वेळ असतो, तेव्हा काम करायचं नाही आणि मग धावपळ करायची. आपलंही बरेचदा असंच होतं ना?

तुम्हाला माहित आहेत अशा काही चपखल, मार्मिक म्हणी? पण वेगळ्या हव्यात हं! अगदी "आग रामेश्वरी नि बंब सोमेश्वरी' एवढ्या सुपरिचित नकोत.
-----------------