नवनीत

भावना नाहीत माझ्या, शब्दही नाहीत माझे
अंतरी का वाटते पण हे असावे गीत माझे?

पुस्तके, एकांत, गाणी, लेखणी, शाई नि कागद
विखुरले अस्तित्व सारे ह्याच सामग्रीत माझे

कल्पनांची कामधेनू येत आगंतुक कधीही
दोहतो अदृश्य कोणी,  भासते नवनीत माझे

वर्ख माझ्या वैखरीचा लावला असली तरीही
बोलवीता वेगळा आहे धनी, संगीत माझे

स्पर्शता परतत्त्व, गाते लेखणी उत्तुंग गाणी
एरवी हरवून जाते बोलणे गर्दीत माझे

का तुझ्या शब्दांस येतो गंध हा पहिल्या सरीचा?
"पाय मी रोवून आहे घट्ट ह्या मातीत माझे"

जे निके, जे सत्त्व आहे ते कसे माझे म्हणू मी?
भृंग, वर हा शारदेचा, काय अभिव्यक्तीत माझे?