छोले भटुरे

  • छोल्यांसाठी- २ ते २.५ वाट्या काबुली चणे (छोले)
  • ३ मध्यम कांदे+ १ कांदा वरून घालण्यासाठी
  • २ ते ३ टोमॅटो
  • १ उकडलेला बटाटा
  • १/२ चमचा गरम मसाला, १.५ चमचा छोले मसाला, आल्याचा तुकडा २ पेरांएवढा,६/७ लसूण पाकळ्या
  • डावभर तेल, मीठ चवीनुसार, तिखट चमचाभर, मूठभर कोथिंबिर,चाट मसाला
  • भटुऱ्यांसाठी- ३ वाट्या मैदा
  • कोरेडे यिस्ट १ चमचा , ओले असेल तर ५ ग्रामचा १ क्युब
  • २ चमचे दही. यिस्ट नसेल तर ५ चमचे दही
  • २ चमचे तूप, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा साखर, वाटीभर गरम पाणी, तळणीसाठी तेल
तीन तास
४ जणांना

छोले- ७ ते ८ तास चणे भिजत घाला, कुकरमधून ३ ते ४ शिट्ट्या देऊन काढा.
बटाटा उकडून घ्या.
कांदे बारीक चौकोनी चिरा किवा मिक्सर मधून काढा.आले +लसूण वाटा.टोमॅटोही मिक्सर मधून काढा. 
तेल गरम करून त्यात कांदा घाला, त्यावर आले लसूण पेस्ट घाला. तिखट घाला व परता,गरम मसाला घालून परता.छोले मसाला घालून परता. टोमॅटो घाला व परता.
उकडलेल्या छोल्यातले साधारण वाटीभर छोले बाजूला काढा व बाकीचे वरील मिश्रणात घाला. बाजूला काढलेले छोले मिक्सरमधून काढा आणि आता हे वाटण वरील छोल्यात घाला.चवीनुसार मीठ घाला. पाणी घालून खळखळून उकळू द्या.
उकडलेला बटाटा लांबट चिरून घाला. चिरलेली कोथिंबिर घालून सजवा.
भटुरे, पुऱ्या किवा पावाबरोबर खा.
खायला देताना छोल्यांवर बारीक चिरलेला कांदा+कोथिंबिर+चाट मसाला घालून द्या.

भटुरे-एका वाडग्यात यिस्ट व साखर गरम पाण्यात घालून ५ मिनिटे ठेवा.
तूप, मीठ व दही परातीत एकत्र करून हाताने फेसून घ्या. त्यात मैदा घाला. यिस्टच्या पाण्यात सैलसर भिजवा व चांगले मळा.(पिझ्झ्याला भिजवतो तसे) अजून पाण्याची गरज भासली तर दही/ताक त्याऐवजी वापरा.
१ तासभर तरी झाकून ठेवून द्या. पीठ फुलून येईल.
नंतर पुरी लाटा, मग हाताने ती सर्व बाजूनी थोडीथोडी ताणा व लगेचच तळा. तळताना आच मध्यम हवी.

नेहमी करतो त्या पुरीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची पुरी भटुऱ्यासाठी बनवा.
वरील साहित्यात साधारण २५ भटुरे होतात.

.