... काय बाकी?

.......................................
... काय बाकी?
....................................

तुझ्या तनूला हळूहळू लाभते तकाकी...
हसून कोणीतरी विचारेल, `काय बाकी? `

हळूच तू लाजशील, बघशील फक्त खाली...!
कशी तरीही लपेल गालावरील लाली ?

दिसेल डोळ्यांत तेज; कांतीवरी झळाळी...
अजूनही पण भरात आली कुठे नव्हाळी?

हळू हूळू मंद होत जातील हालचाली...
तुझे निराळेच जग मनी अन् सभोवताली!

स्थिरावतो त्याच त्या विचारावरी कवडसा...!
जडावल्यां पापण्यांत हलकीच झोप दिवसा...!!

तुझ्याच रूपात रूप स्वप्नी तुला दिसावे...
मिटून डोळे तुझ्याकडे पाहुनी हसावे...!

नवीनवेली.... नवीनवेलीच पोटुशी तू...
खरेच होशील धन्य... बसल्यावरी ढुशी तू!

जिवात आता तुझ्या नवा एक जीव आला...
स्वतःस सांभाळ आणि सांभाळ त्या जिवाला !!

- प्रदीप कुलकर्णी

....................................
रचनाकाल ः १९ सप्टेंबर २००८
....................................