उदो ग अंबे उदो ..

आज प्रतिपदा, नवरात्रीचा पहिला दिवस, सर्व मनोगतीना नवरात्रीच्या शुभेच्छा!
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्र म्हणले जाते. प्रतिपदेस घटस्थापना केली जाते. नवमीपर्यत सप्तशतीचा पाठ वाचला जातो.. अहोरात्र देवाजवळ नंदादीप लावला जातो.
लिहीताना माझं मन बालपणीच्या नवरात्रीच्या आठवणीत गेलंय.. आज्जी आजोबा ,आई बाबा यांच्या बाळबोध संस्कारात प्रत्येक सण फार सुरेख साजरा होत असे.

आज अमेरिकेत हे सर्व साजरे करत असताना मध्येच या आठवणीच्या कुपीचा सुगंध मनामध्ये दरवळत राहतो आणि मग इकडे ऊदबत्ती लावली की आठवतो तिकडचा धुप, इकडे  आरती करताना घंटेचा मंजूळ किणकिणाट येतो अन कानात घुमतो तिकडे सर्वांसहित केलेल्या दणदणीत आरतीमधील टाळांचा नाद.
आठवते ती नऊवारी नेसून नथ घालून घाईघाई करीत असलेली आज्जीची छबी आणि छान जरीची साडी नेसून मोगर्याचा खास पत्रावळीत बांधून आणलेला गजरा अन दागिने घातलेल्या आईची लगबग.
आजोबा सोवळं नेसून पुजा करणार असायचे आणि बाबा धोतर्याचा काचा कसा मरावा असा विचार करत जान्हवं शोधायचे ..आणि माझा चाललेला दंगा ..

उदो बोला उदो आंबाबाई माउलीचा हो.. उदो का रे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो.. ही आरती नऊ दिवसांपर्यत पाठ होत असे. धुवपद जोर जोरात म्हणत असू.
रोज एकेक फ़ुलांची माळ वाढवत नेऊन नवव्या दिवशी नऊ माळा होत असत. महालक्ष्मीची पुजा होत असे ती अश्विन शुद्ध अष्टमीला. आज्जी देवळात जाउन एक तरी घागरी फुंकत असे. त्याचा फूऽ फूऽ असा आवाज धीरगंभीरपणे गाभार्यात घुमत राही . तिथल्या काही बायकांच्या अंगात येत असे त्याना मग हळदीकुंकू लावून नमस्कार करून जाण्याची पद्धत असे.
रात्री टिपर्या खेळणे, नाच करणे गाणी वगेरे धम्माल करत असु.
भोंडला किंवा हादगा ही असायचा , आमच्याकडे एक झूल असलेली दगडी हत्तीची जोडी होती, त्यातला एक हत्ती आज्जी भोंडल्याला काढत असे. त्याभोवती रांगोळी काढून फेर घरून "एलमा पेलमा गणेश देवा" ..पासून ते "सासरच्या वाटे कुचूकुचू काटे अन माहेरच्या वाटे नारळ फुटे." पर्यंत सर्व गाणी जोरदार म्हणून मग निरनिराळ्या खिरापती ओळखून त्यावर ताव मारायचा म्हणजे एक पर्वणीच असे.
अनेक आठवणी मनात फेर धरून नाचतात ना. तुमच्याही काही खास आठवणी असतीलच नवरात्रीच्या दिवसांच्या. जरूर लिहा.नक्कीच वाचायला आवडतील सगळ्याना.