बाप्पा आमच्या अमेरिकेतल्या घरी!!!

माझ्या यजमानांची २ वर्षांसाठी अमेरिकेत बदली झाली. आणि आम्ही भारत सोडून अमेरिकेत आलो. आम्ही आलो तेव्हा जून महिना संपतच आला होता. सर्व स्थिरस्थावर होईपर्यंत श्रावण सुरू व्हायचे वेध लागायला लागले. इथे आलो तरी आपले संस्कार विसरू शकत नाही. श्रावणातली लगबग इथे असणे शक्यच नव्हते. पण शक्य तितके सारे साजरे करायचे हे मनाशी पक्के ठरवले होते. त्याप्रमाणे सोमवारचा उपवास केला. नागपंचमीला नागाची पूजा केली. लाह्या नव्हत्या म्हणून पॉपकॉर्न वाहिले. शुक्रवारी जिवतीची पुजा केली. जिवतीचा पट भारतातून आणला होता. पुरणाचा नैवेद्य केला. मुलांना औक्षण केले. तर असा सांग्रसंगीत श्रावण सरला आणि वेध लागले भादव्याचे....... म्हणजेच गौरी-गणपतीचे......भारतात फोन झाले की तिथली गडबड घरच्यांच्या बोलण्यात जाणवू लागली होती. इथे गणपती कसा करुया? याचा विचार मन करू लागले.

पण गणपतीची मुर्ती मिळेल की नाही याची माहिती नव्हती. कारण मी जिथे राहते तिथे भारतीय कमी आहेत. मराठीतर बोटावर मोजण्याइतकेच. एक इंडियन दुकान आहे. त्यांना मुर्तीबद्दल विचारले तर त्यांनी नक्की मिळेल असे सांगितले नाही. त्यामुळे त्यावर विसंबून चालणार नव्हते. कुठून मुर्ती मिळेल हे समजेना. माझ्या मुलीचाही प्रश्न चालू झाला, " आई, इंडियासारखा बाप्पा आणायचा ना आपण? " आणायचा हे नक्की होते. मुर्ती नाही मिळाली तर सुपारीचा बसवायचा असे आम्ही दोघांनी ठरवले.

पण म्हणतात ना, 'इच्छा तिथे मार्ग! ' आमचे शिकागोला जायचे ठरले. शिकागो म्हणजे बरेच भारतीय आहेत असे माहित होते त्यामुळे मुर्ती नक्की मिळेल याची खात्री होती. आणी झालेही तसेच‌. शिकगोचा 'देव्हॉन ऍव्हेन्यु' म्हणजे पुण्यातला 'लक्ष्मी रोड'. जिकडे बघावे तिकडे भारतीय. भारत सोडल्यापासून इतके भारतीय एकत्र बघायची सवय मोडली होती. माझ्या मुलीने तर फार बोलका प्रश्न विचारला, "आई आपण अमेरिकेत येताना विमानाने आलो आणि इंडियात गाडीने कसे पोहोचलो? " इतके सगळीकडे वातावरण भारतीय होते. औषधालाही अमेरिकन दिसला नाही. तर मग तिथे मुर्ती मिळाली नसती तर नवल वाटले असते.विड्याची पाने मिळाली. बाकी पूजासाहित्य भारतातून आणले होतेच.

गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. सुट्टी नव्हती. त्यामुळे पहाटे लवकर उठून गणपतीची स्थापना केली‌‌. सजावट आदलेदिवशीच करून ठेवली होती. मोदकांचा नैवेद्य झाला. आणि मग नवरा  आणि मुलगी पळाले̱. घरात प्रसन्न वाटत होते. आपल्या घरात बाप्पा विराजमान झाले यावर विश्वासच बसेना. इथे इतकी सुंदर फुले बघायला मिळतात पण तोडणे शक्य नाही. जास्वंदीची फुले आमच्या शेजारी होती. पण त्यांना मागायची कशी, मागितली तर ते देतील का? असे प्रश्न पडायचे. मग विचार केला. असो. चांदीचे फूल आणि दुर्वा आहेत त्यावर काम चालवून घेवू. आपले बाप्पाही हे समजून घेतील. माझी एक मैत्रीण आहे ती बिनधास्त कुठेही फुले तोडते म्हणते ,"कोणी ओरडले तर बघू गं. " पण मला ते पटत नाही. मी विचार करते की चोरून फुले वाहण्यापेक्षा न वाहिलेली बरी.

इथे रांगोळी नाही. मग मी छान पांढरे जाळीचे पेपर मिळाले त्यावर स्केचपेनने, कुंकवाने रांगोळी काढली आहे. मग रोज नवीन कागद ठेवायची. त्यामुळे नवीन प्रकारे गणपती सजला होता. हे सगळे करताना तितकाच आनंद मिळत होता जेवढा भारतात मिळत होता. कदाचित काकणभर जास्तच... कारण इथे गणपती बसवणे शक्य होईल की नाही असे वाटत असताना, अत्यंत छान साजरा झाला गणपती..

गणपतींबरोबर गौरीही बसवल्या होत्या. ते ही सर्व मनोगतींपर्यंत पोहोचवायचे आहे, पण ते पुढील भागात........