पिकलं पान!!!!

आम्ही अमेरिकेत आल्यानंतरचा हा पहिलाच 'फॉल [ऑटम] ऋतू. ' म्हणजे आयुष्यातला हा पहिलाच फॉल ऋतू. आपल्याकडे ६ ऋतू पण इकडे चारच. पानगळती अनुभवली आहे. पण पाने कधी गळून जातात कळतही  नाही. कविता शिकली होती,

आला शिशिर संपत, पानगळती सरली,

ऋतूराजाची चाहूल पानावेलींना लागली.

यामध्ये शिकल्याप्रमाणे शिशिरामध्ये पाने गळून जातात. पण लहानपणी शिशिर येतो कसा, त्या वेळेला पानगळ होते कशी हे कधी कळलेच नाही. फक्त परीक्षेत प्रश्न यायचा म्हणून हे सगळं पाठ केले होते. पण इथे आले आणि प्रत्येक ऋतूत इथली ४ वर्षाची मुलेही किती छान आनंद घेतात हे पाहिलं. म्हणजे आनंद आम्हीही घेत असू. पण तो ऋतू अनुभवणं म्हणजे काय ?हे कधी कळलंच नाही. पण इथे मुलांना शाळेत हवामान, सिझन हे सारं अनुभवायला शिकवतात.

तर हा फॉल म्हणजे पानेगळणे पण ती पाने पडतात म्हणजे फक्त पिवळी होऊन गळून पडली असं होत नाही. त्यापूर्वी ती पाने लाल, केशरी, तपकिरी असे सुंदर रंग घेत अखेर पिवळी होऊन पडून जातात. नवीन पालवी फुटणे, झाडाला पाने, फुले लागणे, आणि मग ती पाने गळणे हे निसर्गचक्र आहे. त्यामुळे हे सारे घडते. पण त्याच्या इतक्या छटा असतात हे आपल्याला नाही बघायला मिळत कधी. पण यामागेही पुन्हा निसर्गच. आपल्याकडे उष्ण हवेमुळे हिरवी पाने आणि पिवळी पिकली पाने यामधील रंगीबेरंगी पाने ही स्थिती आपण अनुभवू शकत नाही.हा अनुभव इथे अतिशय सुंदर वाटतो. झाडे लाल, केशरी, तपकिरी न्हाऊन निघालेली असतात. काही झाडे सोन्याची झालेली असतात. त्या झाडांकडे बघितल्यावर लहानपणीच्या गोष्टी आठवल्या, 'जादूचे झाड', 'सोन्याच्या झाडावरील पोपट' आणि मन बालपणीची सफर करून आले. असे वाटले की त्यावेळी ती सगळी अदभुत दुनिया वाटायची. सोन्याचे झाड कधीच नसते. पण इथे फॉल कलर पाहिले आणि वाटलं अरे असंच तर झाड आपण गोष्टीत वाचलं होतं. हे झालं बालपण........

या झाडांना पाहताना आपल्याकडची पिकली पाने आठवली. आणि आठवलं आपण पाने गळताना कधी पाहत नाही बसत. पानगळ पाहायला कुठे भटकायला नाही जात. उलट या दिवसात प्रचंड कचरा होतो म्हणून वैतागतो मात्र नक्की. अगदी आपल्याकडे माणूस६० च्या पुढे गेला की तो विचार करायला लागतो. यात नैराश्य डोकावतं. पण ही पाने पिकण्यापूर्वी इतकी सुंदर दिसतात हे ही आपण पहायला हवं. हे आपल्या आजी-आजोबांना दाखवायला हवं. म्हणून मी याचे खूप फोटो काढले आहेत. माझी कितीतरी माणसे आहेत जी इकडे कधीच येणार नाहीत. त्यांना मला हे फोटो दाखवायचे आहेत.

काही दिवसच दिसणारे हे रंग पहायला आम्ही जंगलात भटकायला गेलो होतो. अतिशय वेगळा अनुभव घेतला. डोळ्यांचे पारणे फिटले.

लाल, केशरी, हिरवी, पाने होती सोनसळी,

जणू निसर्गाने खेळली झाडांशी होळी.