राहिले माझेतुझे नाते घसाऱ्यासारखे

राहिले माझेतुझे नाते घसाऱ्यासारखे
भेटतो भेटावयाला पण चुकाऱ्यासारखे


लागला मौनातल्या वाटेवरी वाडा तुझा
आणि काही शब्द मातीच्या ढिगाऱ्यासारखे


याद आली श्रावणाची त्या तुझ्यामाझ्या पुन्हा
जाहले काळीज मोराच्या पिसाऱ्यासारखे


या तुझ्या शहरात सारी माणसांची जंगले
रात इथली पारधी, दिनही शिकाऱ्यासारखे


लाभली होतीस क्षणभर तू सुगंधासारखी
हुंदडावे वाटले आजन्म वाऱ्यासारखे


मी कधी करणार नव्हतो पापण्या ओल्या मुळी
दुःखही माझ्यापुढे आले भिकाऱ्यासारखे


एवढ्या खोलात माझी चौकशी करतेस तू
ह्रदय का हे सातबाराच्या उताऱ्यासारखे


जीवना आतातरी देशील का पत्ता तुझा
खेळतो आहे कधीचे मी जुगाऱ्यासारखे


डायरीमध्ये तुझा उल्लेखही नव्हता तरी
एक कोरे पान का हलते शहाऱ्यासारखे


तारका, आकाशगंगा, चंद्र, उल्कांच्या सरी
शेवटी ब्रह्मांडही माझ्या पसाऱ्यासारखे


— चित्तरंजन भट